Sunday, June 28, 2015

दखलपात्र बातम्या -

दखलपात्र बातम्या - 
काही सरळ, काही गंभीर, काही खट्याळ

12. फुकुशिमा आता धोक्याबाहेर!!
11. वट पौर्णिमेला बार्बीचे नवे रूप
10. जंतू जुमानत नाहीत मग? आपल्यातल्यांना सांगा ना ...
9.  “बालगुन्हेगारी” कायद्यात वैज्ञानिक विचारांचा अभाव
8. रक्त गोठवणारा भयपट... बघणे फायदेशिर? 
7. अनुवांशिक रोग उपचाराची  नवी दिशा
6. राऊंड अप तणनाशक कितपत सुरक्षित? 
5. बहुमजली शेती ‍!?
4. कुरुवाई गावातील शेतकर्‍यांच्या एकोप्याने भाताचे उत्पादन वाढवण्यात किड्यांचा हातभार
3. सिकल पेशींमुळे आदिवासींच्या वाट्याला काय येते? 
२. न्यूयॉर्कमधील शाळांत विद्यार्थ्यांना मोफत नाश्ता!
१. अमरनाथ यात्रेत शीतपेये आणि ‘सटरफटर’ खाद्यावर बंदी --- 

12. फुकुशिमा आता धोक्याबाहेर

मार्च 2011 मध्ये सुनामी येऊन जपानमधील फुकुशिमा येथील अणुऊर्जा केंद्रावर मोठा आघात झाला. तिथला किरणोत्सार पार अमेरिकेपर्यंत पोहोचला अशा बातम्या होत्या.
आता 2018 साली तेथे कोणताही घातक किरणोत्सार राहिला नाही असे अणुऊर्जा तज्ज्ञ सांगत आहेत.
गेल्या साडेसात वर्षात तिथे उत्पादन झालेल्या वेगवेगळ्या अन्नपदार्थांच्या दोन लाखांहून अधिक वेळा तपासण्या करण्यात आल्या.
एवढ्यात झालेल्या तपासणीनुसार तेथील अन्न घटकांमधून 100 बेक्वेरेल प्रती किलोग्राम मागे एवढाच किरणोत्सार येत आहे. हा किरणोत्सार माणसाच्या सहन क्षमतेपेक्षा खूपच कमी आहे.
युरोपियन युनियनच्या मापदंडानुसार 1250 बेक्वेरेल प्रति किलोग्रॅम तर अमेरिकेच्या मापदंडानुसार 1200 बेक्वेरेल प्रति किलोग्रॅम एवढा किरणोत्सार माणसाला हानीकारक नाही. 
गेल्या वर्षभरात फुकुशिमा आणि परिसरात पिकवलेली धान्यं, वाढवलेल्या कोंबड्या, अंडी यामध्ये अत्यल्प प्रमाणात किरणोत्सार आढळला आहे. आता तिथले शेतकरी आपण पिकवलेला माल बाजारात विकायला उत्सुक आहेत. 
शेवटी कोणताही किरणोत्सार नैसर्गिक रित्या कमी होत असतोच. आणि आपल्या सर्वांच्या शरीरातही किरणोत्सार असतोच. तर आता फुकुशिमाची सुटका करायला हरकत नाही.!!!!!

11. वट पौर्णिमेला बार्बीचा नवा अवतार 

वट पौर्णिमेला बार्बीचा नवा अवतार प्रकाशित ---

2018 सालच्या वट पौर्णिमेच्या दिवशी बार्बी या बाहुलीचा एक नवा अवतार प्रकाशित झाला. नाही नाही, वडाला फेऱ्या मारणारी बार्बी असे तुमच्या मनात आले असेल तर तसे काही नाही. तर हा बार्बीचा अवतार म्हणजे एक रोबोटिक्स इंजिनीअरचा अवतार आहे. असे बार्बीची निर्माती कंपनी मॅटेल यांनी अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे जाहीर केले. त्या दिवशी वट पौर्णिमा होती हा एक योगायोग आहे. त्यांना वट पौर्णिमेबद्दल बहुधा माहितीही नसावी.
1959 साली निर्माण झालेल्या बार्बीने अनेक वर्षे आपली बाहुलीची भूमिका इमाने इतबारे वठवली. नट्टापट्टा करणं,  सुंदर सुंदर दिसणं, केन बरोबर नाच करणं, सडपातळ राहाणं. एवढंच तिच्याकडून अपेक्षित होतं. गेली अनेक वर्षे आपल्या विविध रुपात कोणत्याही देशातल्या स्त्री वेशात तिनं ते काम केलं. जणू काही आदर्श स्त्रीचा एक नमुनाच. पूर्वी महाराष्ट्रात ठकी होती. त्रिकोणी ओंडक्यासारखी, लाकडाची, हात पाय शरीराला बांधलेली, हळदीची पिवळी साडी चापून चोपून नेसलेली. नंतर ती जरा आधुनिक झाली. लाकडाऐवजी प्लॅस्टिकची झाली, एकाच पिवळ्या रंगाऐवजी एकाच लाल किंवा हिरव्या किंवा गुलाबी रंगाची झाली. तिच्या डोक्याला किंवा तळाला छोटी शिट्टी लावली गेली. तिला आवाज मिळाला – स्वत:हून नाही पण दाबली गेली की ती आवाज करायला लागली. दाब काढला जाताना थोडा जास्ती आवाज करायला लागली. तिचा वेशही थोडा बदलला. तिला फ्रॉक मिळाला, पायात बूट मिळाले – तरी सारे एकसाचात बसवलेले. नंतर तिला वेगळे वेगळे हालणारे हात – पाय – डोके मिळाले. आता तिला कोणी ठकी म्हणेना. एका अर्थाने ठकी काळाच्या ओघात कधी तरी संपून गेली. तिची जागा बार्बीने घेतली.
तर बार्बी – आता तीही बदलत आहे. रोबोटिक्स इंजिनिअर पर्यंत पोचली. मॅटेलच्या वरिष्ठ उप संचालक लिसा मॅकनाईट म्हणाल्या की – गेली जवळ जवळ 60 वर्षे बार्बीने मुलींना जे काही सांगितले ते – समाजात असणाऱ्या स्त्रियांच्या दुय्यम भूमिकांबद्दलच. स्त्री देखील कोणी कर्तबगार व्यक्ती होऊ शकते – हे सांगण्याचा आता ती प्रयत्न करणार आहे. प्रत्यक्ष किंवा संगणकावरही खेळताना बार्बी आता बदलेली असेल. रोबोटिक्स इंजिनिअर बार्बी बरोबर खेळताना अनेक अभियांत्रिकी कौशल्येही मुलींना खेळता खेळता शिकता येतील. अशा प्रकारच्या जवळ जवळ 200 व्यवसायांशी निगडीत बार्बी मॅटेल उत्पादित करणार आहे. बाहुल्या खेळण्याच्या वयात आयुष्यात कमाई करण्यासाठी आपली कारकिर्द घडवण्यासाठी काही करण्याची संधी मिळावी असा आमचा प्रयत्न आहे.
बाहुल्यांशी खेळणाऱ्या मुलींना - मोठेपणी आपल्यालाही आपल्या कर्तुत्वाने समाजात आपले स्थान मिळवता येईल असा विश्वास आणि प्रेरणा मिळाली आणि रुजली तर साऱ्या समाजाच्या विकासासाठी हवीच आहे.
भले तुम्ही बार्बी घ्या किंवा नका घेऊ पण ही प्रेरणा आणि असे प्रोत्साहन आपल्या आसपासच्या मुलींना मिळवून देऊ शकाल तर ते मोठ्या सामाजिक बदलाचा पाया घातल्यासारखेच होणार आहे.  
विनय र. र.

10. जंतू जुमानत नाहीत मग? आपल्यातल्यांना सांगा ना ....

जंतू ऐकत नाहीत मग कोणाला सांगणार? आपल्यातल्यांना सांगू या....
सूक्ष्मदर्शकाचा आविष्कार झाला आणि अनेक रोगांचे मूळ कारण सापडले. काही सूक्ष्मजीवजंतू  असतात आणि त्यांची लागण झाली की रोगाची बाधा होते. कोणत्या रोगाचे कारण कोणता जंतू आहे हे नक्की करता यायला लागले. कारण सापडल्यामुळे रोग आवरायचा मार्ग ही सापडला. या जीव जंतूना नष्ट करायचे. त्यांना बाधक ठरतील अशी रसायने शोधून काढायची आणि वापरायची. कधी कधी या रसायनांमुळे आपल्याच शरीरालाही याचा फटका बसणार - ‘साईड इफेक्ट’, मग तो टाळण्यासाठी दुसरी काही रसायने शोधून औषधाचे दुष्परिणाम कमी करायचे किंवा नवेच औषध शोधून काढायचे. रोगजंतू झटपट वाढणारे जीव असतात, माणसाची पुढची पिढी तयार व्हायला 20 वर्षे लागतात तर जंतूंची पुढची पिढी 20 मिनिटात तयार होते. एका तासात तीन पिढ्या आणि एका दिवसात 72 पिढ्या. औषधीच्या माऱ्यातून जिवंत राहिलेले जंतू औषधीची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोचवत असतील का? औषधाला तोंड देत कसे जगायचे याचे ‘संस्कार’ पुढच्या पिढीवर करत असतील का? जीवजंतूच्या शरीरात या रसायनांमुळे झालेले बदल त्यांना सशक्त करत असतील का? यालाच आपण म्हणते की जंतूची औषधप्रतिबंधक शक्ती वाढली. औषधे आता निष्प्रभ ठरायला लागली. शोधा नवी औषधे. अशी चक्रे फिरत राहिली आहेत. नवे औषध शोधायला खूप वेळही लागू शकतो. कारण ते औषध रोगजंतूला लागू व्हायला पाहिजे आणि रोग्याला त्याचा त्रास व्हायला नको.
जंतूंची औषधप्रतिकारक शक्ती कशामुळे वाढते? शरीरातील पेशींना रोगलागण कशामुळे होते? असे संशोधन सतत चालूच आहे.
हिवतापाच्या संदर्भात असे संशोधन दोन गट नवी दिल्ली येथे करत आहेत. एक गट जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील रेण्वीय औषधी विभागात डॉ. आनंद रंगनाथन यांचा आहे, दुसरा गट आहे जनुकीय अभियांत्रिकी आणि जैवतंत्र विषयक आंतरराष्ट्रीय केंद्र येथे डॉ. पवन मल्होत्रा यांचा. त्यांनी रोगजंतूला लक्ष्य करण्याऐवजी रोगजंतू शरीरात ज्या पेशींमध्ये वाढतात त्यांना लक्ष्य केले आहे. जंतू पेशींमध्ये कशाप्रकारे शिरकाव करतात हे समजून घेण्याचे प्रयत्न त्यांनी केले. जसे  हिवतापाचा जंतू आपल्या शरीरातील लाल पेशींमध्ये शिरला की त्याची वाढ झपाट्याने होते आणि माणूस हिवतापाचा रोगी होतो. हिवतापाचा जंतू म्हणजे प्लाझमोडीयम फाल्सिपेरम. त्याचा रक्तपेशीत प्रवेश होतो त्या ठिकाणी पेशीच्या अंगावर सायक्लोफिलीन बी नावाचे रसायन असते. या रसायनाला चिकटून घेतले की फाल्सिपेरमला पेशीच्या आत जाणे सोपे होते. या रसायनाची रचना एका दुसऱ्या रेणूमुळे बदलू शकते. हा दुसरा रेणू पेप्टाईड प्रकारातला एक छोटा रेणू आहे. तो सायक्लोफिलीन बी ला जाऊन चिकटला की सायक्लोफिलीन बी ची रचना बदलते आणि त्याला हिवतापाचा जंतू चिकटू शकत नाही. हा पेप्टाईड प्रकारातला रेणू रक्तपेशीला कोणतीही बाधा पोचवत नाही. या प्रकाराने फाल्सिपेरमची लागण होण्याच्या शक्यतेत 80% घट होते. असे डॉ. रंगनाथन यांना दिसून आले आहे. ते म्हणतात, “औषधींमुळे जंतूंमध्ये जैविक बदल होतो तसा लाल रक्तपेशीत होत नाही. त्यामुळे आम्ही रक्तपेशींवर आमचे लक्ष केंद्रित केले. जंतूत जनुकीय बदल घडून येण्याचे काम थांबवणारे एक औषधी रसायन आहे - (सायक्लोस्पोरीन ए), ते लाल रक्तपेशीच्या आवरणावरील सायक्लोफिलीन बी ला जाऊन चिकटले की तेथे येणारा हिवतापाचा जंतू जिवंत राहू शकत नाही. पण या औषधीला प्रतिकार करणारा जनुकीय बदल जंतुमध्ये होऊ शकतो. त्यामुळे ते औषध काही काळाने निष्प्रभ ठरू शकते. हिवतापाचा जंतू आणि माणसातील लाल रक्त पेशी यांची जोडणी होताना चार प्रकारच्या मोठ्या रेणूंचा संबंध येत असल्याचे आम्हाला आढळले. त्यातील दोन लाल रक्तपेशीतले तर दोन हिवतापाच्या जंतूमधले आहेत. या चौघांपैकी एकाची रचना बिघडवली तरी लाल रक्तपेशींना जंतूंची लागण होणे थांबवता येईल. जंतूमधील त्या रेणूंमध्ये ढवळाढवळ केली तर काही काळाने जंतू जिवंत राहाण्यासाठी आपली रचना बदलून घेऊ शकतील आणि आपले प्रयत्न निष्फळ ठरतील त्या ऐवजी आपल्याच लाल रक्तपेशींमध्ये सुधारणा केली तर ती टिकण्याची शक्यता अधिक.”
जंतूंची आणि शरीरातील पेशींची जोडणी ज्या प्रक्रियेने होते तेथेच पेप्टाईड प्रकारातले रसायन वापरले गेले तर जंतूलागणीवर नियंत्रण ठेवता येईल. आपल्याच रक्तपेशींची तशी तयारी करून घेणे अधिक परिणामकारक होईल असे वाटते. जंतू ऐकेनासे झाले तर आपल्याच पेशींना समजवणारे काही मार्ग चोखाळायला हवेत. रोगप्रतिकारकता वाढवणे हे झालेला रोगनिवारण करण्यापेक्षा मूलभूत कार्य आहे.    
9. “बालगुन्हेगारी” कायद्यात वैज्ञानिक विचारांचा अभाव

एकदा बिरबलासमोर तीन गुन्हेगारांना आणण्यात आले, तिघांनीही एकाच प्रकारचा चोरीचा गुन्हा केला होता.
बिरबलाने त्या तिघांना वेगवेगळ्या शिक्षा द्यायला सुचवले.
एकाला नुसतेच ताकीद देऊन सोडायला सांगितले. दुसऱ्याला एक दिवस कारावास तर तिसऱ्याला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुचवली.
ऐकणाऱ्यांना विचित्र वाटले. एकाच गुन्ह्यासाठी तीन वेगवेगळ्या शिक्षा हे अन्यायाचे वाटले.
तेव्हा बिरबलाने स्पष्टीकरण दिले.
त्याला असे आढळले की पहिल्या व्यक्तीला आपण चोरी केली याची अतिशय लाज वाटत आहे, त्याचे स्वत:चे मन त्याला खात आहे, आपण केलेली ही गोष्ट त्याला जन्मभर डाचत राहील. त्याच्या भावनेचा अंकुश त्याच्यावर सतत राहील, त्यामुळे तो चोरी करायला धजावणार नाही.
दुसऱ्या व्यक्तिला आपल्या कृत्याचा विचार करून पश्चाताप पावायला एक दिवसाचा एकांतवास हवा. त्या काळात तो विचार करेल आणि पुन्हा ही कृती करायला प्रवृत्त होणार नाही.
तिसरी व्यक्ती मात्र निर्ढावलेली दिसत होती. आपण चोरी केली त्यात काय विशेष अशी बेफिकीरी तिच्या चेहेऱ्यावर दिसत होती, हे बिरबलाला जाणवले. दहा वर्षांचा सश्रम कारावास ती बेफिकीरी घालवायला लागेल यासाठी तशी शिक्षा बिरबलाने सुचवली.

आज आपल्याला कायद्याने – समान गुन्ह्याला समान शिक्षा – हे सूत्र दिले आहे. न्यायाधीशांच्या आकलनानुसार शिक्षा थोडी-फार कमी अधिक करायला काही वाव ठेवलेला आहे हेही खरेच. त्यातही कधी कधी न्यायाधीश आपल्या निकालपत्रात आपले मत व्यक्त करताना क्वचिच असेही लिहीतात की – माझ्या समोरच्या आरोपीने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप पहाता अतिशय कडक शिक्षा व्हायला हवी पण कायद्याने माझे हात बांधले आहेत म्हणून मी अमूक तमूक इतकी कमाल शिक्षा फर्मावत आहे. तर कधी अमुक गुन्ह्याची घटना घडली हे खरे आहे मात्र पोलिसांनी सादर केलेल्या सबळ पुराव्याअभावी आरोपीला मुक्त करण्यात येत आहे.

इंग्रजांनी भारतावर राज्य केले. त्यात एक अपरिचित न्याय व्यवस्था येथे रुजवण्यात आली. “पुरावे” प्रधान मानणारी न्याय व्यवस्था. खुन्याने खून केल्याचे कबूल केले तरी खुनाचे हत्यार न्यायालयासमोर येत नाही तोवर “सबळ पुराव्याच्या अभाव” असल्याने खुन्याला शिक्षा देण्याचा निवाडा देणे लांबणीवर पडते. शिवाय प्रत्येक खुनामागे काही तरी हेतू असतोच – तो कार्यकारण भाव समजून घेतल्याशिवाय निवाडा कसा द्यायचा असा विज्ञानवादी आवही या पद्धतीत आणणे शक्य असते. न्यायालयात निवाड्याचे काम करणाऱ्या व्यक्तिंना आणि कायदा उल्लंघन केल्याबद्दल शिक्षेची तरतूद करणाऱ्यांना आधुनिक विज्ञानाचे ज्ञान कितपत असते याची कल्पना नाही. मनोविज्ञान, शरीरविज्ञान, मस्तिष्कविज्ञान, वर्तनविज्ञान, समूहविज्ञान, समाजविज्ञान इत्यादी क्षेज्ञांमध्ये प्रचंड अभ्यास झाले आहेत, होत आहेत त्यांची दखल घेत कायदे आणि न्यायव्यवस्था आधुनिक करत करत पुढे नेली जाते हे प्रभावीपणे होताना दिसत नाही. त्यामुळे सामाजिक जडणीघडणीच्या वेगातील वाढीत होणारा झपाटा आणि न्यायनिवाडे करणाऱ्या यंत्रणेतील मंदपणा विरोधाभासी जाणवतो. रेंगाळत चालणाऱ्या न्याय प्रक्रियेपोटी कधी कधी न्यायाधीशही न्यायालयाबाहेर तडजोड करायचा सल्ला देतात. आधुनिक काळात क्वचित काही खटल्यांमध्ये टेलिकॉन्स्फरिंग साक्षीपुरावे करायला मान्यता देताना दिसत आहेत. पण ते प्रमाण अजून तुरळक आहे.

इंग्रजांच्या अमदानीतले कायदे बदलण्याबाबतच्या मागण्या विविध जनआंदोलनांनी सतत चालू ठेवल्या आहेत. मनमोहनसिंगांच्या पंतप्रधानकीच्या काळात आदिवासींचा जंगलावर अधिकार मान्य करणारा कायदा झाला आणि त्याच्या प्रस्तावनेत इंग्रज अमदानीतील कायद्यामुळे आदिवासींवर झालेल्या अन्यायाचा उल्लेख करत तो अन्याय दूर करण्यासाठी हा नवा वनअधिकार कायदा अस्तित्वात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर – मी कायदे आणणारा नाही तर कायदे संपवणारा पंतप्रधान आहे अशी घोषणा केलेली आहे. अर्थात जुने कायदे बदलताना त्यात निव्वळ बदलाची भावना किती, मजबूरी किती, मतलबीपणा किती आणि वैज्ञानिकता किती हे तपासून बघितले पाहिजे. पर्यावरण शाबूत राखण्यासाठी २-३ दशकांपूर्वी जाग आल्याने केलेले कायदे उद्योगधंद्यांच्या वाढीला अडथळा ठरतात असे म्हणत मोडणे, वाकवणे, रद्द करणे हे दिर्घकालीन शहाणपणाचे लक्षण नाही.

एवढ्यात “बालगुन्हेगारी” कायद्यात करावयाच्या बदलाचे वेळी या मुद्द्यांविषयी विचार मंथन करायला एक संधी मिळाली होती. त्यावेळी मूळ मुद्द्याला हात घातला जावा अशी अपेक्षा होती. तसा फार मुळातून विचार झाला नाही मात्र कायद्यात सर्वानुमते मान्य झालेले बदल केले गेले.

बालगुन्हेगारी संबंधीत कायद्याचे मूळ “बाल” या शब्दाच्या स्पष्टीकरणात आहे. त्यासाठी शारीरिक वय हा निकष ठरवला गेला आहे. देह १८ वर्षांचा झाला की ती व्यक्ती बाल राहत नाही. वय १८च का याचे संयुक्तिक कारण काय असावे अशी शंका येते. १८ वर्षे झाली की व्यक्ती प्रौढ झाली असे मानले जाते. अंगी प्रौढपणा येतो म्हणजे नेमके काय होते? अंगी प्रौढपणा आला आहे हे ठरवण्याचे नेमके निकष कोणते? त्यात केवळ शारीरिक बाबींचाच विचार होतो की मानसिक, बौद्धिक, भावनिक, सामूहीक वर्तन यांचाही समावेश होतो? वय १६ वर्षे ११ महिने ३६४ दिवस असताना नसलेले आणि एका दिवसानंतर आलेले कायदेशिर प्रौढत्व यात प्रचंड फरक पडतो असे मानायचे का?


शारीरिकदृष्ट्या वयात येणे म्हणजे पुनर्उत्पादनाशी संबंधित लिंग अवयवांचे कार्य नियमित सुरू होणे – असे मानले तर १८ हे वय फारच जास्त आहे असे मानण्यास जागा आहे. थंड हवामानाच्या प्रदेशात, उजेड कमी असणाऱ्या भागांमध्ये वयात येणे उशिरा होते त्या मानाने आपल्या देशासारख्या ऊष्ण प्रदेशात मुली ११ वर्षांपासून तर मुलगे १४ वर्षांपासून वयात यायला लागतात. अर्थात यात व्यक्तिपरत्वे शारीरिक, अनुवांशिक फरक पडतो. शरीर पोषण योग्य होणे, पुरेसा सकस आहार मिळणे या बाबींचाही प्रभाव पडतो. माणसाने लैंगिकता आणि वंशसातत्य राखण्याचे कार्य यांचे नियमन होण्यासाठी विवाह संस्थेची रचना केली. त्यामुळे विवाहाबाबत कायदे करणे ओघानेच आले. आपल्याकडे मुलींसाठी १८ वर्षे तर मुलग्यांसाठी २१ वर्षे ही विवाह करण्याची किमान वयोमर्यादा घालून दिली आहे. या वयाला मुली आणि मुलगे सक्षम होतात असे मानले आहे. मुलीचे लग्न १८ वर्षांच्या आधी करणे तसेच मुलग्याचे लग्न २१ वर्षांच्या आधी करणे हा कायद्याने गुन्हा ठरवला आहे. मग २१ वर्षापर्यंत मुलगे “बाल” आहेत असे का मानत नाहीत?

लग्नाच्या बाबतीत २० वर्षे ११ महिने ३६४ दिवस झालेला मुलगा “बाल” असतो मात्र १८ वर्षे ते २० वर्षे ११ महिने ३६४ दिवसांपर्यंतच्या वयाची मुलगी कायद्याने “बाल” न राहाता “प्रौढ” झालेली असते. मग “बाल” वयात कायद्याने “प्रौढ” ठरवलेल्या मुलींना त्याबद्दल काही विशेष अधिकार कायद्याने द्यायला नकोत? किंवा उलट २० वर्षे ११ महिने ३६४ दिवसांपर्यंतच्या मुलग्यांना “बालगुन्हेगारी”चा कायदा तरी लागू व्हायला पाहिजे.

प्रौढपणाचा संबंध शारीरिक विशेषत: पुनरूत्पादनाच्या कामी लागणाऱ्या अवयवांच्या वाढीशी घातला जातो. त्यांच्या वापरातून निर्माण होणाऱ्या लैगिक कृत्यांशी घातला जातो. मध्यंतरी १६ वर्षाचे वरील मुलीने संमतीने शरीरसुख घेतले तर तिला तो अधिकार असायला हवा याबद्दल बराच उहापोह झाला. त्यात १६ वर्षांवरील मुलग्यांच्या शरीरसुखाबद्दलही चर्चा झाली असावी. सध्याच्या काळात पूर्वीच्या काळापेक्षा कमी वयात लैंगिक भावना बळावण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. त्याचे एक कारण म्हणजे लैंगिक भावना वाढीस घालणारी रंजनाची साधने विपुल झालेली आहेत. घराघरात असणाऱ्या टिव्ही वाहिन्यांवरील अनेक कार्यक्रम, चित्रपटांमधील लैंगिक भावना चेतावणारी दृष्ये, बाह्यलैंगिक अवयवांना उठावदारपणे दाखवणारी नाचगाणी, संगणकाला जोडलेल्या इंटरनेटच्या माध्यमातून सहज उपलब्ध होणाऱ्या नग्नमुद्रा, शरीरसंबंध दाखवणारे व्हिडिओपट, आता तर मोबाईलच्या माध्यमातून इंटरनेटवरच्या या बाबी अगदी हाताच्या बोटाच्या तालावर आलेल्या आहेत. कोणत्याही देशाचे सेन्सॉर बोर्ड या बाबींना कात्री लावायला असमर्थ आहे. दुसरे कारण म्हणजे लैंगिकता पोषक आहार आणि लैंगिकता पोषक औषधी सहज उपलब्ध होत आहेत. कांद्यासारखा लैंगिकभावनेला उत्तेजना देणारा पदार्थ “गरीबांचे अन्न” असल्याने त्याचे भाव वाढले किंवा त्याची टंचाई झाली की तो मुद्दा घेऊन अनेक सरकारेसुद्धा कोसळतात. तिसरे कारण वैश्विक तापमानवाढ असायला हरकत नाही. नैसर्गिकरित्या उष्ण हवामानाच्या प्रदेशात “वयात” येण्याचे वय मुळातच कमी असते ते वैश्विक तापमानवाढीने आणखी कमी होत असेल तर आश्चर्य वाटायला नको. या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर १५ वर्षे ११ महिने २९ दिवसांपर्यंतच्या वयाच्या बलात्कारी मुलग्याला १८ वर्षांवरील प्रौढाला लागू असणारी गुन्हेगारी वर्तणूक दिली पाहिजे असे सर्व संमतीने मान्य झाले. याचा अर्थ पुन्हा एकदा फक्त शारीरिक वय हाच निकष गाभाभूत मानला गेला.

 कायद्यानुसार कोणाला प्रौढ किंवा बालक ठरवताना शरीराबरोबर मानसिकता, भावभावना, सामूहिकता, वैचारिक प्रगल्भता या गोष्टींची दखल घेतली पाहीजे असे कोणाला वाटते आहे का नाही ?
लहान बाळे त्यांच्या नैसर्गिक गरजेप्रमाणे त्या त्या वेळी मलमूत्रविसर्जन करतात. मग ते घरात असो की सार्वजनिक ठिकाणी. सार्वजनिक ठिकाणी मलमूत्रविसर्जन करणे हा कायद्याने गुन्हा असला तरी या बालकांना तो लागू करून त्यांना शिक्षा देणे असे होत नाही, कारण या बाळांची मानसिक क्षमता शारीरिक प्रेरणांपेक्षा कमी बळकट असतात हे सर्वचजण मान्य करतात, समजून घेतात. मग हाच तर्क ज्यांच्या मलमूत्रविसर्जनाच्यासारख्या स्वाभाविक शारीरिक प्रेरणा मनोबळाने ताब्यात ठेवता येत नाहीत अशा १८ वर्षांवरील लोकांनाही लागू करायला नकोत? अर्थात मग त्यांना बालक किवा न-प्रौढ म्हणणे आणि केवळ प्रौढांनाच मिळणारे किंवा दिले जाणारे अधिकार न देणे हेही तर्कसुसंगत ठरेल.

एखाद्या व्यक्तिचे मानसिक बळ शारीरिक नैसर्गिक प्रेरणांहून बळकट असणे – याला समजूतदारपणा म्हणतात – हा प्रौढपणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. समजूतदारपणा संस्कारांनीही येत असतो. पालक आपल्या पाल्यांना घडवताना आपल्या वागण्या-बोलण्यातून आपल्या उद्दीपित भावनांना योग्य वेळी शमवण्यासाठी त्यांचा ताण सोसण्याचे अनुभव देत असतात. त्याला सभ्यपणा म्हणतात. अशा अनेक व्यक्ती आणि कुटुंबांच्या घडणीतून समाज सुसंस्कृत होत असतो. हे वर्तन व्यक्तिगत, कुटुंबगत आणि समूहगत प्रौढपणाचे निदर्शक आहे – ते १८ वर्षांआधी येत नाही असे कायदा मानतो, असे म्हणावे लागेल.

समजूतदारपणा वाढण्यासाठी संस्कार कारणीभूत असतात त्याचप्रमाणे त्या व्यक्तिचा मेंदूही संस्कार घेण्याइतका विकसित झालेलाअसायला लागतो.
मेंदू अभ्यासकांनी केलेल्या अनेक अभ्यासांवरून मेंदूची वाढ पूर्ण होण्यासाठी २५ वर्षांचा कालावधी लागतो. मेंदूची वाढ झाली आहे का? किती झाली आहे? याचे मोजमाप करण्याची साधने निर्माण करण्यात आलेली आहेत. मेंदूविकास तपासण्याच्या कसोट्याही विकसित झालेल्या आहेत. २००७ साली जाहीर झालेल्या एका संशोधनाने ही बाब स्पष्टपणे दाखवून दिली आहे. त्यासाठी ३ ते १८ या वयोगटातील सुदृढ, निरोगी अशा सुमारे १००० व्यक्तिंच्या विद्युत चुंबकीय प्रतिमांचे विश्लेषण करण्यात आले. अमेरिकेतील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थया संस्थेने हा निष्कर्ष काढलेला आहे. २००५ साली प्रसिद्ध झालेल्या “किशोर वयातील मेंदूविकास आणि गुन्हेगारी दुष्कृत्ये” या डॉ. जय गैड्ड यांच्या शोधनिबंधात म्हटले आहे की – “कार्याचे नियोजन, संघटन, क्रमवारी, अपेक्षित प्रभाव या बाबी ठरवणाऱ्या मेंदूच्या भागाची वाढ घडलेली नसते ...... त्यामुळे प्रौढ व्यक्तिकडून अपेक्षित – विचारपूर्क कृती करण्याची अपेक्षा किशोरवयीन व्यक्तिकडून तशी अपेक्षा ठेवणे अन्यायाचे आहे.”

मज्जाविज्ञानाने केलेल्या वाटचालीवरून असे दिसते की कपाळाच्या मागे असणारा मेंदूची पुढचा भार सर्वात शेवटी विकसित होतो. हाच भाग भावभावना, सद्सद्विवेक आणि निर्णय घेण्याच्या क्षमता ठरवत असतो. त्याचा झालेला विकास लक्षात घेऊनच “दुष्कृत्यांबद्दल” शिक्षा देण्याचा विचार केला पाहिजे.

या शिवाय किशोर वयात शरीरात स्रवणारी विविध रसायने अनियमितपणे स्रवत असल्याने त्याचाही वागणुकीवर परिणाम होत कधी अतितीव्र तर कधी अतिमंद वागणूक घडते. त्या काळात त्यांचा शरीरावर स्वत:चा ताबा नसतो. त्यामुळे त्यांना शिक्षा देताना वेगळा विचार करणे आवश्यक ठरते.

दुसऱ्या बाजूने विचार केला तर – या रसायनांची शरीरातील पातळी, नियमितता आणि कपाळामागील मेंदूची वाढ याची मोजमापे करून ती व्यक्ती प्रौढ आहे की नाही हे तपासून नक्की करता येईल. कपाळीचा मेंदू भावभावनांचे नियंत्रण करतो, डोके बिथरण्यापासून सावरतो आणि सम्यक निर्णय घेतो. त्यामुळेच कदाचित काही चुकले की आपणच आपले कपाळ बडवून घेतो किंवा कपाळाला हात बसतो किंवा अगदीत पुढे जाऊन – भाळी लिहीलेले चुकत नाही - असे मानतो. आज विज्ञान – तंत्रज्ञानाच्या जोडीने ‘कपाळी’ म्हणजे कपाळामागच्या मेंदूत काय आहे याची उकल करण्याची सोय करून दिलेली आहे. त्याची तपासणी करून ती ती व्यक्ती ‘प्रौढ’ झालेली आहे का नाही हे तटस्थपणे, वस्तुनिष्ठपणे खात्रीशिरपणे जोखता येईल.

बाल व किशोर यांच्या मानसशास्त्राच्या अभ्यासक प्रीती जेकब यांच्या मते – प्रौढपणासाठी १८ वर्षे ही वयोमर्यादा अनमानधपक्याने ठरवली आहे. तिला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. ती मर्यादा १६ वर्षे करणे यालाही कोणता वेज्ञानिक आधार नाही.
मेंदूची वाढ पूर्ण न झालेल्या व्यक्ती एखादी जोखीम घेताना पूर्ण विचार करू शकत नाहीत कारण त्याच्या शरीरातील डोपामाईन या रसायनाची पातळी पुरेशी नसते. डोपामाईन हे “शहाणपणा”चे रसायन आहे असे म्हणता येते. शरीरात पुरेसे डोपामाईन असेल तर विविध मज्जातंतूमध्ये विचारांची देवाण घेवाण व्यवस्थित होते. डोपामाईनच्या अभावी प्रौढ न झालेल्या व्यक्ती आपल्या भावना काबूत ठेऊ शकत नाहीत, त्यांनी तिरिमिरीत घेतलेले निर्णय त्यांना, इतरांना आणि समाजालाही घातक ठरतात. अशा व्यक्तिंच्या मेंदूतील कानाच्या वरच्या भागात मेंदूत असणारे – अमायग्डाला हे भावना केंद्रातील मज्जातंतू थोराड आणि ताठर असल्याचे आढळते. असे लोक थोड्याश्या ताणाने भयभीत होतात, आक्रस्ताळे होतात आणि आक्रमक होतात. प्रौढपणाचे लक्षण असणारे ‘धैर्य’ त्यांच्यात नसते. त्यांचा मेंदू आणि म्हणून वागणे बाल्यावस्थेसारखेच असते. ते लोक अनुभवातून येणारे शहाणपण आणि विवेक दाखवू शकत नाहीत.

असे “वयाने वाढलेले प्रौढ” जेव्हा राज्यकर्ते होतात, अधिकारी होतात, न्यायाधीश होतात त्या वेळी त्या त्या समाजाची वाताहत होण्याची शक्यता बळावते. “प्रौढ” म्हणजे केवळ “देहाने १८ वर्षे” झाली असे ठरवून केलेल्या व्यवस्था आणि त्यातले प्रौढांना दिलेले अधिकार शंकास्पद झालेले आहेत. देह नव्हे तर – मेंदू, मेंदूची रचना आणि मेंदूतले स्राव यांचे मापन करून व्यक्ती “प्रौढ” आहे की नाही हे ठरवले पाहिजे.

कधी काळी नियोजनकार आणि अंमलदार यांच्यात अशा “प्रौढ” लोकांचा भरणा झाला तर ते जनतेला “१८ वर्षे झाली” म्हणून प्रौढ घोषित न करता ती “मेंदूने प्रौढ झाली” याची तपासणी करून त्यांना “प्रौढ” म्हणून घोषित करतील. बाकीचे न-प्रौढ ठरल्याने त्यांना “बालगुन्हेगारी”चा कायदा लागू करता येईल. शिवाय त्यांना प्रौढपणाचे फायदेही मिळणार नाहीत.
आपण “प्रौढ” असल्यामुळे अशा गोष्टी होण्यासाठी लागणारे “धैर्य” आपल्याकडे भरपूर असल्याने आपण तसे होण्याची वाट पाहू शकतो!


8. रक्त गोठवणारा भयपट... बघणे फायदेशिर? 
एखादा भयपट पाहतांना आपले हातपाय गार पडले, रक्त गोठले असा अनुभव तुम्ही कधी घेतला आहे का? भयपटाची जाहीरात करताना – अंगावर रोमांच उभे करणारा – किंवा – रक्त गोठवणारा – अशी जाहीरात करतात. ती वाचून प्रेक्षक आकर्षित होतात.  
मनात भीती निर्माण करणारे चित्रपट, कथा, कादंबऱ्या, दूरदर्शन मालिका, गोष्टी अनेक जण आवडीने पाहतात, वाचतात, ऐकतात. माणसाला भीती वाटून घ्यायला आवडते का?

http://forefrontofscience.blogspot.com/2014/08/western-ghat-diversity-nanju-and.html


7. अनुवांशिक रोग - सुरू होण्याआधीच उपचार शक्य !!!

आपल्याला अनुवांशिकतेने जीवन मिळते. आपले आई–वडील यांच्याकडून आपल्याला निम्मे निम्मे अनुवांशिक गुण प्राप्त होतात. केस, डोळे, नाक, कान, चेहेरेपट्टी, बांधा किंवा अंगकाठी यांची ठेवण - इत्यादी बाहेरून दिसणाऱ्या गोष्टी अनुवांशिकतेने मिळतात. भाषा, वेषभूषा, खाणे, पिणे, सामाजिक भाव-भावना, धर्म, श्रद्धा या गोष्टी परंपरा आणि संस्कृतीतून येतात. त्यांच्यात कालमानानुसार बदलही होतात.

दूर दूर राहाणारे लोक काही कारणाने एकत्र आले की त्यांच्यात काही ना काही देवाण-घेवाण होते. प्रत्यक्ष वस्तूरूप देणे-घेणे होते तसे त्या त्या लोकांच्या अंगांवर, कपड्यांवर, दागदागिन्यांवर असणाऱ्या जीवजंतूंचीही देवाण-घेवाण होत असते. त्यातून शरीरात, शरीरावर काही परिणाम होतात. जे परिणाम त्रासदायक असतात त्यांना आपण रोग म्हणतो. काही चांगले परिणामही होत असतील. मात्र त्रास झाला की तो दिसतो, सांगितला जातो, बरे वाटले की त्याचा फारसा प्रचार होत नाही. अशा प्रकारातून जगभरात अनेक रोगांचा प्रसार झाला. आजही होत आहे. सर्दी, ताप, खोकला अशापासून देवी, गोवर, कांजिण्या, पोलिओ, क्षय, प्लेग, पटकी, स्वाईन फ्लू, एडस, एबोला इत्यादी रोगांपर्यंत विविध पातळ्यांवरचे रोग पसरत राहीले. नवे नवे रोग आले की ते अधिक घातक वाटतात. कालांतराने त्या रोगांची भीती वाटेनाशी होते. एक बाजूने वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे लोक त्या रोगांवर संशोधन करून त्यांच्यावर कोणत्या उपाय योजना करता येतील ते शोधून काढतात. दुसरे म्हणजे रोगाची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये त्या रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती नैसर्गिकरित्या तयार होते. तिसरी बाब म्हणजे ही रोग प्रतिकारशक्ती समाजातल्या अनेक व्यक्तींमध्ये विकसित झाल्यावर त्यातून एक प्रकारची सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते आणि त्यामुळे ज्यांच्या शरीरात अशी रोगप्रतिकार शक्ती नाही अशांनासुद्धा रोगापासून संरक्षण मिळते. कालांतराने ही रोगप्रतिकारशक्ती त्या त्या समाजातील लोकांच्या जनुकीय जडणीघडणीचा भाग होते. अशा वंशातील पुढील पिढ्यांना रोगांपासून पिढीजात संरक्षण मिळते. तो त्यांच्या अनुवांशिकतेचा भाग होतो.

अनुवांशिकतेने बाह्यरुपाचे गुणधर्म ठरतात तसेच शरीराच्या अंतर्गत रचनांचेही गुणधर्म ठरतात. शरीराला होऊ शकणारे विकार, व्याधी आयुष्याच्या कोणत्या कालखंडात किंवा कोणत्या परिस्थितीत बळावणार हेही ठरत असते. व्यक्तिच्या शरीरात अब्जावधी पेशी असतात. त्या प्रत्येक पेशीत केंद्रक असते. त्या केंद्रकात गुणसूत्रे असतात. गुणसूत्रातील कार्यक्षम जनुके त्या त्या व्यक्तीच्या घडणीसाठी कारण ठरतात. आता जनुकीय अभ्यास इतके सूक्ष्म झाले आहेत की त्यातून आई-वडील यांच्या मिलनानंतर होणाऱ्या बाळाचे रंग-रूप, विकार यांचा जीवनपट आधीच उलगडून दाखवता येतो. विविध अनुवंशिक विकार जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर होतील याचा अंदाज बांधता येतो. काही काळाने आपल्याला हव्या तशा रंगरुपाचे संतान निवडण्यासाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध होतील. होणाऱ्या बाळाचे लिंगनिदान आज गर्भजलपरीक्षा करून करता येते तसे होणाऱ्या बाळाचे प्रकृतीनिदानही करता येईल. गर्भजलपरीक्षा करून स्त्रीलिंगी गर्भ पाडून टाकण्याची लाट काही भागात आली आणि त्यामुळे त्या त्या समाजात स्त्री-पुरूष संख्येचा समतोल ढासळला. दर हजार मुलग्यांमागे मुलींचे प्रमाण कमी होत गेले अगदी सातशे पर्यंतही खाली आले. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून गर्भजलपरीक्षा करण्यावर बंदी घालण्यात आली. त्याची जागा सोनोग्राफीसारख्या तुलनेने सोप्या आणि कमी वेळ लागणाऱ्या तंत्राने घेतली. त्यातून पुन्हा जन्माआधीच स्त्रीलिंगी गर्भ पाडून टाकणे शक्य झाले.  अर्थात सोनोग्राफी किंवा गर्भजलपरीक्षा करण्याची सोय होण्याआधी ‘मुलगी झाली’ म्हणून तिला जीवे मारण्याचे प्रकारही काही पुरूषप्रधान समाजात होत आले आणि अजूनही चालू आहेत. काही समाजात मुलीला हीन वागणूक देऊन - नको जीव करून सोडले जाते. त्यातून ज्या मुली जगतात वाढतात त्यांना असमान वागणूक दिली जाते. यालाच पुरूषप्रधान समाज व्यवस्था म्हणतात. मानवी वंश पुढे चालू ठेवण्यासाठी स्त्री आणि पुरूष दोन्हीही लागणार, ते समान संख्येने असतील तर सर्वांना आपापला संसार करण्याची समान संधी मिळणार आणि मानवी समाजाचा गाडा पुढे सरकणार. एका गर्भजलपरीक्षणातून लिंगनिदान करण्याची सुविधा उपलब्ध झाल्यावर इतक्या समस्या उद्‍भवल्या तर जनुकीय पातळीवर प्रकृती निदान करण्याची सुविधा सगळीकडे उपलब्ध झाली तर समाजाला कोणकोणते परिणाम भोगावे लागतील? गोऱ्यागोमट्या रंगाच्या व्यक्तिंना अधिक महत्व देणाऱ्या समाजात मग काळ्या रंगाच्या व्यक्तिंना अधिकच चेपले जाऊ शकेल. उष्ण हवामानात नैसर्गिकरित्या काळ्या रंगाच्या व्यक्तिंना सुखकारकपणे वावरता येते, गोऱ्यांना त्या हवेत त्रास होतो. जनुकीय प्रकृतीनिदान करून गोरीगोमटी मुले पैदास होऊ लागली तर त्याचा ताण वैद्यकीय आणि अन्य सुविधांवर येईल आणि सामाजिक समस्याही निर्माण होतील. जनुकीय पातळीवर प्रकृती निदान करण्यावर बंदीही घातली जाऊ शकेल. बंदी घालून समस्या सोडवता येतात असे मानण्याची अनुवांशिक मानसिकता आपल्या देशात आहे का? असेल तर त्यावर काही उपाय करता येईल का? मानसिकतेवर उपाय करता येईल का नाही माहिती नाही पण अनुवांशिक रोगांवर उपाय योजना करण्याच्या कामाच वैज्ञानिकांना यश येत आहे.

काही विकार पुढच्या पिढ्यांमध्ये जातात हे पूर्वीही अनुमानाने माहिती झाले होते. पण त्याचे नेमके कारण समजत नव्हते, त्यामुळे एखादा असा विकार झाला की त्या व्यक्तीच्या हातून काही तरी पापकृत्य झाले किंवा शाप लागला किंवा देवाच्या करण्यात काहीतरी राहून गेले किंवा नजर लागली किंवा घराण्याच्या पुरूषाचा शाप आहे किवा गेल्या जन्मीचे कर्म भोगावे लागत आहे अशा कल्पना करून कुतूहलाचे शमन केले जायचे. अशा समजुती मान्य नसणाऱ्या व्यक्ती तरीही शोध घ्यायच्या आणि नेमके कारण सापडेपर्यंत पिच्छा सोडायच्या नाहीत. त्यातून विज्ञान विकसित होत आले. पिढीजात किंवा अनुवांशिक ठेवण तसेच रोग आणि विकार यांच्या कारणांचाही शोध लागला. अनुवंशाने मिळणाऱ्या कोणत्या गुणासाठी कोणते जनुक कारण आहे ते नेमकेपणाने सांगता यायला लागले. ते जनुक रंगसूत्रांच्या गोतावळ्यात कोठे आहे ते तपासता यायला लागले. नवनवीन साधने आणि विशिष्ठ रसायने शोधली गेली. ती वापरण्याचे योग्य आणि प्रभावी तंत्र शोधले गेले. एकदा कारण सापडले की त्याच्या आधाराने उपाय योजना करण्याची विद्याही अवगत आणि विकसित होत जाते.
जनुकीय पातळीवर तपासणी, निदान आणि बदल करता येतील असे एक तंत्र आता विकसित झाले आहे. त्याचे नाव ‘क्रिस्पर-कॅस९’ CRISPER-Cas9 असे ठेवण्यात आले आहे. ते तुलनेने सोपे, स्वस्त आणि सर्वत्र प्रसार होऊ शकेल असे आहे. मुळात हे तंत्र माणसाने निसर्गातील सूक्ष्म जीवांच्या अभ्यासातून मिळवले आहे.
सूक्ष्मजीवांना विषाणूंच्या हल्ल्याचा धोका सततच असतो. विषाणूपेक्षा सूक्ष्मजीव जवळ जवळ हजारपट मोठा असतो. किडा-मुंगीच्या तुलनेत हत्ती असावा तसा. एखादा विषाणू सूक्ष्मजीवाच्या आवरणावर आला की आपल्या आकडीसारख्या भागांनी आवरण घट्ट पकडतो आणि अणकुचीदार सुईसारख्या भागाने सूक्ष्मजीवाच्या आवरणाला भोक पाडतो. आपल्या शरीरातील डिएनए सूक्ष्मजीवाच्या देहात सोडतो. विषाणूचा डिएनए सूक्ष्मजीवाच्या डिएनएचे तुकडे करून त्या तुकड्यांचा वापर आपल्या डिएनएच्या प्रती काढण्यासाठी करतो. तशी प्रत झाली की तिच्याभोवती सूक्ष्मजीवाच्या देहातील प्रथिनांचा वापर करत आपले आवरण करतो. अशा प्रकारे काही क्षणांमध्ये एका सूक्ष्मजीवाच्या देहाचा कच्चा माल वापरून हजारो विषाणू तयार होतात. सूक्ष्मजीवालाही आपला जीव प्यारा असतोच. विषाणूच्या हल्ल्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी सूक्ष्मजीवाच्या शरीरात काही साखळ्या असतात. हारात गुंफलेल्या फुलांच्या रचनेप्रमाणे या साखळ्या प्रथिनांनी गुंफलेल्या असतात. त्यांच्या कडांना अशी प्रथिने असतात की जी विषाणू डिएनएला विशिष्ठ जागी कापून त्यांचे तुकडे करतात आणि त्यांची वाढण्याची क्षमता निष्प्रभ करतात. हेच तंत्र क्रिस्पर या नावाने ओळखले जाते. यातील कॅस९ हे प्रथिन साखळीच्या दोन्ही कडांना असते. कॅस९चा वापर करून डिएनएचे तुकडे नेमक्या जागी करणे शक्य होते.
क्रिस्पर तंत्राचा वापर करून जगभर प्रयोगशाळांमधून उंदीर तसेच अन्य प्राण्यांवर प्रयोग चालू आहेत. चीनमधील वैज्ञानिकांनी अरुज्य म्हणजे गर्भाशयात रुजू न शकणाऱ्या मानवी भ्रुणावरही याचे प्रयोग केले. विशेषत: थॅलॅसिमिया या अनुवांशिक नसणाऱ्या रक्तविकारावर क्रिस्पर तंत्राने काही उपाय मिळवण्यासाठी प्रयोग केले. मात्र ते यशस्वी झाले नाहीत. अजून तरी हे तंत्र मानवी जनुकांवर प्रभाव पाडण्याइतके विकसित झालेले नाही असा दावा प्रयोगाअंती चीनी वैज्ञानिकांनी केला आहे. या तंत्राचा वापर करून शरीराला घातक असणाऱ्या जनुकांवर कॅस९ची कात्री चालवून पुढे होणारे विकार रोखणे शक्य आहे असे या क्षेत्रातील संशोधकांना वाटते आहे. मात्र रोगकारी जनुके काढताना अन्य काही दुष्परिणाम होणारच असेही या संशोधकांचे म्हणणे आहे. त्याचा पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय मानवाला लागू करणे जोखमीचे आहे असे संशोधकांना वाटते. मूळपेशीविज्ञान आणि पुनर्घटी औषधोपचार या क्षेत्रातील जेष्ठ मान्यवर डॉ. आर रामस्वामी म्हणतात की – “अशाप्रकारे मानवी जनुकांच्या पातळीवर खेळ करणे हे अनैतिक तर आहेच पण ते तंत्र अजून कच्च्या अवस्थेत आहे. त्यात अचूकपणाचा अभाव आहे आणि त्यातून कल्पनेच्याही पलिकडच्या गोष्टी घडू शकतात ही मुख्य समस्या आहे.”. डॉ. आर रामस्वामी बंगळुरू येथील इंस्टीट्यूट ऑफ स्टेम सेल बायोलॉजी अँड रिजनरेटिव्ह मेडिसीन या संस्थेत कार्य करतात. त्यांच्या मते – “एखाद्याच जनूकात केलेल्या बदलामुळे बाकी गोष्टींमध्ये कोणकाणते बदल होतील याची कल्पना करण्याइतके समर्थ आपण नाही. आपण अजून तरी देवाची जागा घ्यायला लायक झालेलो नाही.” जनूकीय पातळीवर कात्री चालवण्याचे परिणाम पुढे पिढी दर पिढी भोगावे लागतील.
नॅशनल सेंटर ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस या बंगळुरातील संस्थेतील प्राध्यापक डॉ. मित्रदास पणिकर हे एक मज्जातज्ज्ञ आहेत. त्यांच्या मते – “सूक्ष्म अशा जनूकीय पातळीवर बदल करता येणे ही पूर्वी अगदीच अशक्य कोटीतील गोष्ट होती तितकी ती आता राहिलेली नाही सध्या उपलब्ध असलेले तंत्र किमान १० ते कमाल ४० टक्केपर्यंत यश देऊ शकते आहे. या तंत्राचा वापर होणे हे संयुक्तिकही आहे आणि गरजेचेही आहे.”
जगात कोठेही भ्रूणावर जनूकीय प्रयोग करण्याला कायदेशिर आडकाठी नाही. सध्या अनेक खासगी तसेच सरकारी प्रयोगशाळांतून प्रयोग चालू आहेत. औषधे आणि औषधोपचार पद्धतींवर नियंत्रण ठेवणार्‍या खात्यांना या तंत्राची फारशी जाणीव नाही. त्यामुळे आहेत त्या कायद्यांमध्ये यातून निर्माण होणाऱ्या समस्या हाताळल्या जातील. अमेरिकेत संशोधनासाठी देण्यात आलेले सरकारी आर्थिक सहाय्य अशा संशोधनासाठी वापरण्यास मज्जाव आहे. इंग्लंडमध्ये मानवी भ्रूणाच्या जनूकांवर संशोधन करण्यासाठी अर्ज करून परवाना मिळवावा लागतो. प्रयोग केलेल्या भ्रूणाची विल्हेवाट १४ दिवसांच्या आत लावली पाहिजे ही अट हा परवाना मिळताना घातली जाते. भारतातही आंतरराष्ट्रीय पातळीवर पाळली जाणारी मार्गदर्शक तत्वे पाळली जातात मात्र तितकीशी कडक अंमलबजावणी होत नाही. भारती वैद्यकीय संशोधन वैधानिक मंडळाच्या यादीत जनूकीय काटछाटीला बंदी आहे मात्र अजून तिला कायद्याच्या चौकटीत बसवले गेलेले नाही.
नेचर मेथड्स या नियतकालिकाच्या प्रमुख संपादक नताली डिसूझा यांच्या मते – “भ्रूणातील जनूकामध्ये हस्तक्षेप करण्याबाबतचे संशोधन हा कुतूहलाचा विषय आहे. मानवी अर्भकामधील जनूकीय फेरफार करण्यात नैतिकतेचा मुद्दा करणे समजू शकते पण भ्रूणावरील प्रयोगांमध्ये नैतिकतेचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे असे मला वाटत नाही.”
२०१२ मध्ये क्रिस्पर तंत्राचा आविष्कार झाला. या तंत्राचे एकस्व कोणाला मिळावे याबद्दल मोठी खडाजंगी चालू आहे. त्यातील काही वैज्ञानिक एकत्र येऊन त्यांनी अमेरिकेतील मॅसॅच्युसेटस परगण्यात – एडीताज् मेडीसीन - ही कंपनी स्थापन केली आहे. रोगकारी जनूकांमध्ये दोष-दुरुस्ती करण्याचे कामी शरीरातील सामान्य पेशींचाच वापर केला जाईल असा दावा एडीताज् मेडीसीन या कंपनीने केला आहे. त्यामुळे वंशसातत्याच्या कामी येणाऱ्या पेशी वापरात न घेतल्याने याचे परिणाम वारसांवर होणार नाहीत असा दावा कंपनीने केला आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये या कंपनीने बिल गेट्स व अन्य धनवानांकडून १२ कोटी डॉलर (सुमारे ७२० कोटी रुपये) मिळवले आहेत.
१ ते ३ डिसेंबर २०१५ या काळात अमेरिकेत वॉशिंग्टन डी सी येथे – मानवी जनुकांमधील हस्तक्षेप – या विषयावर विचार विनिमय करण्यासाठी या क्षेत्रातील शेकडो वैज्ञानिकाची एक शिखर परिषद झाली. या परिषदेत या विषयांतील विज्ञान, वैद्यक, शासन, प्रशासन, कायदा, संशोधन, वापर आणि परिणाम या संबंधीच्या विविध पैलूंवर विचारविमर्ष झाला. जनुकीय हस्तक्षेपाचे तंत्र अजून पुरेसे खात्रीशिर आणि निर्धोक झालेले नाही, अशा परिस्थितीत आज त्याचा वापर करणे बेजबाबदारपणाचे ठरेल अशी घोषणा परिषदेने एकमताने केली. मात्र त्यावर बंदी घालण्याबाबत एकवाक्यता झाली नाही.
येत्या २-३ वर्षात हे तंत्र व्यवहारात वापरण्यालायक होण्याची शक्यता डॉ. एस. रामस्वामी यांनी व्यक्त केली आहे. विशेषत: रेटीनीटीस पिगमेंटोसा या नेत्र विकारावर जनूकीय हस्तक्षेप तंत्र वापरण्याबाबत चालू असलेल्या संशोधनाच्या स्थितीवरून डॉ.ना तसे वाटते आहे. रेटीनीटीस पिगमेंटोसा हा नेत्रविकार अनुवांशिक आहे. यात व्यक्ति तरूणपणातच हळुहळू अंध होत जाते. आधी काळोख पडायला लागला की दिसेनासे होते मग हळुहळू कडेकडेच्या गोष्टी दिसेनाश्या होतात. डोळे पूर्ण उघडे असले तरी एखाद्या नळीतून बघितल्यासारखे फक्त मधल्या भागातलेच दिसते. नंतर नंतर हा भागही आक्रसत जातो. रेटीनीटीस पिगमेंटोसा या नेत्र विकारावर कोणतीही उपाय योजना उपलब्ध नाही. अ जीवनसत्व आणि लूटेन या औषधांच्या वापराने अंधत्व टाळता येत नसले तरी लांबवता येते. हा नेत्रविकार भारतात दर ३००० लोकांमागे एका व्यक्तिला आहे. विशेषत: जवळच्या म्हणजे चुलत-चुलत, आत्ये-मामे नात्यात विवाह करणाऱ्या खानदानांमध्ये, अल्पसंख्य जातीसमूहांमध्ये हा विकार आढळतो. अशा विवाहांतून निर्माण झालेली संतती आंधळी असण्याची शक्यता वाढलेली असते. एका अर्थाने असे विवाह – जात्यंध – म्हणायला पाहिजेत. या विकाराला एक विशिष्ठ जनुक कारणीभूत असते. आईला हा विकार असेल तर मुलाला होतो. आई-वडील दोघांनाही हा विकार नसेल पण त्याच्यापैकी कोणाच्याही घराण्यात एखाद्या पूर्वजाला असेल तर तो मुलीला होण्याची शक्यता अधिक असते. आजोबाला असेल तर नातवाला रेटीनीटीस पिगमेंटोसा हा नेत्रविकार होऊ शकतो. रेटीनीटीस पिगमेंटोसा या नेत्र विकारासाठी कारणीभूत सुमारे ५५ जनुके कारणीभूत असतात. त्यांपैकी कोणती जनुके क्रियाशिल आहेत यावरून नेमक्या कोणत्या स्वरूपाची आणि तीव्रतेची लक्षणे उद्‍भवतील हे सांगणे आता शक्य झाले आहे.
आता आणखी एका प्रकाराने या विकाराचा मुकाबला करणे शक्य होत आहे. या विकाराची लागण होऊ शकणाऱ्या किंवा झालेल्या व्यक्तिच्या काही पेशी घ्यायच्या. या पेशी त्वचेच्या असल्या किंवा रक्तातल्या असल्या तरी चालते. कारण अशा व्यक्तिच्या कोणत्याही पेशीतल्या गुणसूत्रांमध्ये रेटीनीटीस पिगमेंटोसासाठी कारणीभूत असणारी जनुके असतातच. तर त्वचेच्या किंवा रक्तातील पेशीतील सर्व जनूके क्रियाशिल केली की ती पेशी मूळ पेशीसारखी होते. म्हणजे त्या पेशीपासून शरीराच्या कोणत्याही भागासाठी पेशी घडू शकते. य़ाला बहुरूपी पेशी म्हणायला हवे. बहुरूपी पेशी कोणत्याही रूपात जाऊ शकते. अंतस्त्वचेची पेशी होऊ शकते किंवा बाह्यत्वचेची किंवा शरीराच्या अंतर्गत भागाची पेशीही ती होऊ शकते. हवी तर स्नायूपेशी होईल किंवा यकृताची पेशी, मज्जापेशी होईल किंवा नेत्रपटलाची पेशी त्यातून घडवता येईल. अशा मूळ पेशींमधील अनुवांशिक रोग निर्माण करणारी जनूके क्रियाविहीन करणे आता जनूकीय अभियांत्रिकीने शक्य झाले आहे. विशेषत: क्रिस्पर-कॅस९ सारख्या तंत्रामुळे हे काम सुलभ झाले आहे. अशा प्रकारे अनुवांशिक रोग निर्माण न करता कार्य करू शकणाऱ्या निरोगी पेशींचे पातळ थर तयार करून ते लागण झालेल्या भागात शस्त्रक्रियेने रोपणे शक्य आहे. रोपणानंतर या पेशी वाढून रोगट पेशींची जागा घेऊ शकतात आणि रुग्णाला रोगातून मुक्त करू शकतात. रेटीनीटीस पिगमेंटोसा झालेल्याची गेलेली दृष्टीही परत येऊ शकते. येत्या दोन-एक वर्षांमध्ये अशा शस्त्रक्रिया करता येतील असे डॉ. एस. रामस्वामी यांनी सांगितले.
नॅशनल सेंटर ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस या बंगळुरातील संस्थेतील प्राध्यापक डॉ. मित्रदास पणिकर, डॉ. ओदित्य मुखर्जी तसेच मानसिक स्वास्थ्य व मज्जासंस्था विज्ञानाची राष्ट्रीय संस्था याचे डॉ. संजीव जैन यांनी बहुरूपी पेशीचा वापर करून ऍपोलिपोप्रोटीन-४ या जनुकाचे परिक्षण करण्याचे तंत्र विकसित केले आहे. ऍपोलिपोप्रोटीन-४ हे जनुक अलझायमर या रोगाला कारणीभूत असते. क्रिस्पर कॅस-९ या तंत्राचा वापर करून एक पर्यायी पद्धत त्यांनी शोधली आहे. त्याचा वापर करून वेगळ्या प्रकारचे न्यूरॉन तयार करून ते शरीरात रोपण्यालायक करणे ही कामे या गटाने घडवत आणली आहेत.

वैद्यकीय उपचारासाठी एका नवीन पर्वाची पहाट होत आहे.                        
·      6.    राऊंड अप तणनाशक कितपत सुरक्षित?
‘टॉक्सिकॉलॉजी रिपोर्टस’ या संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणाऱ्या नियतकालिकात मेधामूर्ति रुद्रैय्या आणि अपरमिता पांडे यांनी केलल्या संशोधनावर एक शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. या दोघीही भारतीय विज्ञान संस्थान - इंडीयन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स – बेंगलुर मधील - रेण्वीय प्रतिकृती, विकास आणि अनुवांशिकता विभागातील – डिपार्टमेंट ऑफ मॉलिक्युलर रिप्रॉडक्शन, डेव्हलपमेंट अँड जेनेटिक्स मधील - संशोधक आहेत.
मोन्सॅन्टो नावाच्या जगद्विख्यात कंपनीने तयार केलेल्या राऊंड अप या भरपूर खप असलेल्या तृणनाशकामुळे शरीरातील स्टेरॉईड संप्रेरके बनवण्याच्या क्रियेत असंतुलन निर्माण होऊ शकते हे त्यांनी नर उंदरावर केलेल्या प्रयोगातून सिद्ध केले.
या आधी अशाच प्रकारच्या संशोधनांमधून ग्लायकोफॉस्फेट असणारी तृणनाशक रसायनांमुळे कातडीचा कर्करोग, नपुंसकत्व तसेच कंपवात – पर्किनसन – यांसारखे विकार अगर रोग यांच्यांत असणारा संबंध स्पष्ट झालेला आहे. तृणनाशकांमधील वनस्पतींच्या वाढीसाठी काही विशिष्ट अमिनो अम्ले आवश्यक असतात. ही अमिनो अम्ले तयार करू शकणारी संप्रेरके वनस्पतींमध्ये असतात. ग्लायकोफॉस्फेटमुळे ही संप्रेरके खुंटवली जातात. त्यामुळे अमिनो अम्ले तयार होणे बंद होते आणि त्यांच्या अभावामुळे वनस्पती मरतात. ही संप्रेरके मनुष्ये तसेच अन्य प्राण्यांमध्ये नसतात त्यामुळे तृणनाशकांचा कोणताही विपरीत परिणाम माणसांवर तसेच प्राण्यांवर होऊ शकत नाही असे गृहीत धरले गेले. अन्य तृणनाशक रसायनांच्या तुलनेत ग्लायकोफॉस्फेटयुक्त तृणनाशकांना बिनविषारी ठरवण्यात आले.
मेधामूर्ति रुद्रैय्या आणि अपरमिता पांडे यांनी केलल्या संशोधनात प्रयोगातील नर उंदरांना राऊंड अप नावाच्या या तृणनाशकाच्या वेगवेगळ्या मात्रा देण्यात आल्या. उंदराच्या शरीराच्या किलोग्रॅममधील वजनाच्या मापाने किमान १० मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम पासून २५० मिलिग्रॅम प्रति किलोग्रॅम पर्यंत मात्रा अन्नावाटे देण्यात आल्या.
-    टेस्टोस्टेरॉन हे पुल्लींगी ताकदीचे मापक असलेले संप्रेरक नरांमध्ये तयात होत असते. या उंदरांमधील टेस्टोस्टेरॉन निर्मितीचे प्रमाण कमी झालेले आढळले.
-    ऍड्रेनो कॉर्टिको ट्रॉपिक या नावाने ओळखले जाणारे आणखी एक संप्रेरक शरीरात गळ्यातील ग्रंथीत तयार होत असते. या संप्रेरकामुळे शरीरातील ग्लुकोज तसेच मेद यांचे प्रमाण गरजेइतके राखले जाते. राऊंड अप मुळे या संप्रेरकाच्या निर्मितीवरही दुष्परिणाम झालेला आढळला.
-    दोन आठवड्यांनंतर उंदरांच्या शरीरातील - टेस्टोस्टेरॉन आणि कॉर्टिकॉस्टेरॉन यांचे उत्पादन अगदी १० मिलिग्रॅम तसेच ५० मिलिग्रॅम इतक्या कमी मात्रा दिलेल्या उंदरांमध्येही ३३% इतके घटलेले आढळले
-    त्याचप्रमाणे कमी घनतेचे कोलेस्टेरॉलसारखे मेदपदार्थ शोषून घेणारे आरेने रिसेप्टरही बऱ्याच प्रमाणात कमी झालेले दिसले.
-    या कारणांनी उंदरांची भूकही कमी झाली आणि त्यांचे वजन झपाट्याने कमी होत गेले.
-    २५० मिलिग्रॅमची मात्रा दिलेल्या उंदरांमध्ये अन्न खाण्याचे प्रमाण निम्याच्याही खाली सरकले.
-    १० मिलिग्रॅम मात्रा दिलेल्या उंदरांचे वजन ६% इतके कमी झाले.

या सर्वाचा निष्कर्ष असा निघतो की या तृणनाशकाचे सेवन केल्यामुळे उंदरांच्या शरीरातील संप्रेरकांवर झालेला दिसला. राऊंड अप या तणनाशकाचा वापर फार मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे त्याचा अधिक सविस्तर अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे.

(संकलन – विनय र. र. ७ सप्टे. १५)
 5 बहुमजली शेती ‍!?

तामिळनाडु राज्यातील पुदुकोट्टै जिल्ह्यातील गंधर्वकोट्टै तालुक्यातील मदुकुलम् गावाने बहुमजली शेती करण्याची कर्तबगारी दाखवून दिली आहे. २२ वर्षे ‘आधुनिक’ शेती करून पाहिली, कष्ट उपसले, उत्पन्न मिळावे म्हणून आधुनिक बी-बियाणी, खते, कीडनाशके, फवारण्या, बीजवर्धके यावर मोठ्या आशेने पैसे खर्च केले, पण खस्ता खाणेच हाती आले. अनुभवातून पोळल्यावर शहाणे होत सारासार विचार केला, खर्च आणि जमा यांचा ताळमेळ तपासला, उचित तेथे आणि उचित ते तंत्र वापरले आणि आपल्या गावाच्या १०७ एकराच्या रानाचे - स्थानिक भाषेत - अडिसील वनम् – खाद्य देणारे वन घडवले. यात पूर्वभूमी संस्थेच्या पी. सुंदरराज आणि अमेरिकेतून भारतात परतलेल्या आर. सेंतीलनाथ यांच्या सक्रिय सहभागाची मदत झाली.

१९९३-९४ मध्ये येथे काजूची लागवड होती. त्याचे उत्पन्न पुरेसे नव्हते. मग झाडांमधल्या जागेत पामारोझा प्रकाराचे गवत लावून पाहिले मात्र अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही तेव्हा गवताची शेती सोडून दिली. मग ऊस लागवड करून पाहिली. ऊसकापणी करण्याची वेळ आणि ऊसाचा भाव यासाठी साखर कारखान्यावर विसंबावे लागायचे त्यामुळे तेथेही उत्पन्न मिळणे दुरापास्त. मग केळीची बाग करायचे ठरले. याला अधिक मजूर लागले शिवाय केळींचा भाव व्यापारी ठरवणार. मग नारळाची बाग केली. तेथेही किडी आणि रोगराईने नारळ्याच्या उत्पन्नाला नाट लावला. शिवाय भाव मिळणे बाजारभरोसेच. तेव्हा सेंतलीनाथ अमेरिकेतून परत आले होते. त्यांनी शेताचा नकाशा तयार केला. भौगोलिक माहीती तंत्र वापरून नारळाच्या प्रत्येक झाडाचे स्थान नोंदले. कोणत्या झाडाला किती फळे लागतात याची चोख नोंद घेतली. ७५पेक्षा कमी फळे देणारी झाडे काढून टाकली. त्यांच्या मशागतीपायी लागणारा वेळ, खर्च उत्पादन देणार्‍या झाडांवर व्हायला लागला. ५ वर्षात दर झाडामागे येणार्‍या फळांची संख्या १३५ वरून २२५ पर्यंत वाढली. १९९८ मध्ये नारळाला ६ रुपये मिळत ते २०१५ मध्ये नारळामागे ८ इतके झाले. मात्र बाकीच्या खर्चांमध्ये झालेली वाढ कितीतरी होती. मग खते, अन्य आदाने गरजेइतकीच वापरायला सुरूवात केली, मजूरांची संख्या कमी करून पाहिली. आता अगदी वेगळा विचार करणे भाग होते. ‘प्रत्येक रुपयाची गुंतवणूक व्हायला पाहीजे खर्च नाही’ असा विचार केला गेला. नारळ एके नारळ न करता तो विविध प्रकारच्या वनस्पतींची लागवड करण्यात वापरला गेला. नैसर्गिकरीत्या एकमेकींच्या सान्निध्यात वाढणार्‍या वनस्पतींचे एक रान हळुहळू बनत गेले. नारळाची तोडणी करणे बंद केले त्याऐवजी खाली पडणार्‍या नारळांची वेचणी करायला लागले. सूर्याच्या ऊष्णतेवर खोबरे वाळवण्याचे यंत्र वापरून तेल गाळायला लागले. नारळाच्या शेंड्या, करवंट्या, पेंड सारे पुन्हा रानातच जिरवले. २०१४ मध्ये खोबरेल तेलामुळे एकरी दिड लाख रुपये निव्वळ नफा मिळाला. आता येथे बहुमजली शेती होते. उंच झाडांमधून गाळून आलेला प्रकाश त्यापेक्षा ठेंगण्या मग त्यांच्यापेक्षा ठेंगण्या झाडांच्या पानांवरच पडतो. नारळाच्या झाडापासून गवताच्या पानापर्यंत जाणार्‍या प्रकाशाचा कणही जमिनीवर पडणार नाही अशी दाट रचना केली आहे. आता प्रकाशाच्या कणाकणाचे रुपांतर साधन संपत्तीत होते. 
अधिक माहितीसाठी संपर्क - Purvabhumi, Mudukulam, Gandarvkottai Taluk, District Pudukottai Tamilnadu 622203. Phone - P. Sunderraj 9442570075

4. कुरुवाई गावातील शेतकर्‍यांच्या एकोप्याने -
भाताचे उत्पादन वाढवण्यात किड्यांचा हातभार  

भारताच्या नैऋत्य टोकाला असणार्‍या केरळ राज्यात भाताच्या पिकाचे उत्पादन पिकावर बागडणार्‍या किड्यांमुळे वाढल्याचे दिसून आले. मित्र किड्यांच्या वावरामुळे घातक किड्यांवर नियंत्रण मिळवता येते असे दाखवणारा एक अनोखा प्रयोग येथे करण्यात आला.

केरळच्या पलक्कड जिल्ह्यात वडकेंचेरी शहराजवळ कुरूवाई हे एक गाव आहे. या गावातील शेतकर्‍यांनी एकत्र येऊन हा प्रयोग करून बघितला. या प्रयोगात त्यांनी कोणतेही कृत्रिम रासायनिक कीटकनाशक न वापरता भाताचे उत्पादन आणि आपली मिळकत वाढवून दाखवली. त्यांना “आत्मा” या संस्थेने सहकार्य केले.

“आत्मा” अर्थात अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी – ए-टी-एम-ए आत्मा. ही संस्था शेतीतंत्र व्यवस्थापनात काम करते. या संस्थेच्या संचालक के. व्ही. उषा यांनी सांगितले की – कुरुवाई गावातील प्रयोगात सुमारे शंभर शेतकरी कुटुंबे सहभागी झाली. सगळ्यांची मिळून जमीन ३३ हेक्टर. एकेका कुटुंबांकडे किमान १६ गुंठ्यापासून कमाल ६० गुंठ्यापर्यंत शेतजमीन होती. गेल्या अनेक वर्षांपासून ते आपल्या पूर्वापार पद्धतीने भातशेती करत होते. अनेकदा पीक हाती यायचे नाही तर कधी कधी हातचे जायचेही. हमखास पीक येईलच याची खूप खात्री नव्हती. त्यामुळे काहींनी आपली परंपरा सोडून आपली जमीन हळुहळू वेगळ्या पिकांखाली आणायला सुरुवात केली. रोकडा देणारी पिके किंवा केळी किंवा शिवकंद ऊर्फ टॅपिओका. दहा वर्षात भाताखालची जमीन ३३ हेक्टरवरून १८ हेक्टरवर आली. दरम्यान केरळ सरकारने भाताला किलोमागे १९ रुपये इतका हमी भाव दिला. त्यामुळे काही शेतकर्‍यांना पुन्हा भात करण्यात रस निर्माण झाला. पण तोवर शेतमजूरांची चणचण जाणवायला लागली होती. शिवाय किडीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कृत्रिम रासायनिक कीडनाशके वापरायला सुरुवात केली होती.

गेल्या वर्षाच्या रब्बी हंगामात (केरळात त्याला – मुंडकन – म्हणतात) आत्मा या संस्थेच्या सहकार्याने एक वेगळा प्रयोग करायचे कुरुवाईतल्या शेतकर्‍यांनी ठरवले. या प्रयोगात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे – निगराणी - पिकाची वाढ आणि भोवताली असणारे विविध कीटक यांच्यावर लक्ष ठेवणे. ही पद्धत हैद्राबाद येथील - राष्ट्रीय पीक आरोग्य व्यवस्थापन संस्था – यांनी विकसित केली आहे. या पद्धतीत – पीकाच्या वाढीची स्थिती, जमिनीच्या पोताची स्थिती, हवामानाची स्थिती, भोवताली वाढणारे किडे-मकोडे, अन्य उंदीर वगैरे सजीव प्राणी, पिकाला नुकसानकारक ठरतील असे कीटक व त्यांचे प्रमाण या सर्वांचे निरीक्षण करून - दर आठवड्याला काय करायचे याचा निर्णय घेण्यात येतो. कुरुवाईच्या शेतकर्‍यांनी अतिशय काळजीपूर्वक निरीक्षणे केली आणि खुलासेवार नोदी ठेवल्या. त्यातून शेतीसाठी काय काय कामे करायला हवीत हे लक्षात आले आणि तशी कामे केल्याने पीकपाणी चांगले आले.

खर्चात कमी - उत्पादनात वाढ
या प्रयोगाच्या आदल्या वर्षी भाताचे उत्पादन दर हेक्टरी ४२५० किलो होते ते या वर्षी दर हेक्टरी ५५०० किलो झाले. उत्पादनात आधीच्यापेक्षा सुमारे ३०% वाढ झाली. यासाठी हेक्टरी खर्च ४७,७८५ रुपये आला. ५५०० किलो भाताबरोबर ३००० किलो कडबा देखील पदरात पडला. त्यामुळे निव्वळ नफा हेक्टरी ७४,७१५ रुपये झाला. या शिवाय प्रयोगाचे अनुदान म्हणून केरळ शासनाकडून हेक्टरी ११,५०० रुपये मिळाले. नफ्यात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे पिकावर ४ ते ५ वेळा करायला लागणार्‍या कीटकनाशकांच्या फवारण्या बंद झाल्या त्यामुळे हेक्टरी ४००० ते ५००० रुपये नगद वाचले.

आजकाल शेतमजूर मिळेनासे झाले आहेत, शिवाय मजूरीही परवडण्यापलिकडे गेली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी येथील शेतकर्‍यांनी रोपणासाठी तसेच कापणीसाठी अल्प प्रमाण यंत्रे वापरली.

आता यंदा खरीपाच्या हंगामतही शेतकर्‍यांनी ही नवी पद्धत अंमलात आणली आहे.

शेती उत्पादनाला सहाय्यभूत ठरणार्‍या कीटकांची विविधता आणि संख्या इतकी भरपूर आहे की त्यांच्यामुळे शेतीला हानीकारक ठरणार्‍या किडीचे नियंत्रण सहज होते. या पद्धतीने भाजीपाला करणार्‍या शेतकर्‍यांनाही चांगला अनुभव आला. मित्र कीटकांमुळे शत्रुकीटकांचे व्यवस्थित नियंत्रण होते असे दिसले. किटकनाशक विरहीत शेती करण्याच्या या प्रयत्नांना इतके भरघोस यश मिळाले की, कीटकनाशक विरहीत शेतमाल विकण्यासाठी त्यांनी वडकेंचेरी येथे एक दुकान सुरू करून तेथे “वीष-मुक्त” अन्नधान्य भाजीपाला विक्री चालू केली आहे.

२०१३-१४ पासून भाताच्या शेतीत यांत्रिकीकरण आणि कीटकनाशक फवारणी थांबवणे - याबाबत वडकेंचेरी येथील कृषी भवनने शेतकी विभागाच्या सहकार्याने अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत कार्यक्रम राबवण्यात जो पुढाकार घेतला त्यामुळे कुरुवाईच्या शेतकर्‍यांना झालेल्या या फायद्याबद्दल ते निश्चितच कृतज्ञ राहातील. ‘आत्मा’च्या सहभागाबद्दलही ते निश्चितच कृतज्ञ राहातील असेच म्हणता येईल.

केरळ शेती विद्यापीठाचे माजी संचालक संशोधक सी. के. पीतांबरम हे – निगराणीद्वारे वनस्पतींवरील रोग व्यवस्थापनातले तज्ज्ञ आहेत. ते म्हणतात की पारंपरिक शेतीत मित्र-कीटक या कल्पनेकडे कोणी लक्ष दिले नव्हते. कुरुवाई प्रयोग यशस्वी झाला त्यामागचे कारण म्हणजे रोगकारक कीटकांविरूद्ध सामना करण्यासाठी मित्र-कीटकांचा वापर केला गेला. रोगकारक कीड नष्ट करण्यासाठी रासायनिक औषधे फवारली जातात त्यांमुळे आधी मित्र-कीटकांचाच खातमा होतो. कुरुवाई येथील शेतकर्‍यांनी मित्र-कीटक ओळखण्याचे ज्ञान मिळवले, मित्र कीटक आणि शत्रू कीटक यांचे बलाबल सांभाळण्याचे कौशल्य मिळवले, त्यामुळे त्यांना रासायनिक औषधींच्या फवारण्या करण्याची गरज पडली नाही. ही बाब परिसरातल्या सगळ्यांनी मिळून एकविचाराने सामूहिक निर्णय घेऊन करण्याची गरज असते – ते कुरुवाईच्या शेतकर्‍यांनी करून दाखवले. याबद्दल सी. के. पीतांबरम यांनी समाधान व्यक्त केले.

या प्रयोगात घातक कीटकांचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्या उपाय-योजना केल्या गेल्या? याबाबतची अनेक उदाहरणे के. व्ही. उषा यांनी दिली. या उपाय-योजना केल्यामुळे घातक कीटकांची संख्या नियंत्रणात राहिली आणि त्यामुळे पिकाच्या उत्पन्नावर काहीही दुष्परिणाम झाला नाही – असे उषा म्हणाल्या.

घातक कीटक नियंत्रण उपाय-योजना
1.       पिवळ्या खोड अळीचे नियंत्रण करण्यासाठी फेरोमेनचे सापळे वापरले गेले. फेरोमेन म्हणजे कीटकांच्या शरीरातून स्रवणारी रसायने. विशिष्ट प्रकारचे कीटक विशिष्ट प्रकारच्या फेरोमेनकडे आकर्षित होतात. ते तेथे आले की त्यांना बंदीस्त करण्यासाठी सापळ्यांची रचना केलेली असते, त्यात हे कीटक अडकल्यामुळे बाहेर असणार्‍या कीटकांची संख्या कमी होते आणि म्हणून त्यांचे प्रजोत्पादनही नियंत्रणात राहाते.
2.       पिवळ्या खोड अळीच्या अंड्यांवर जगणार्‍या दुसर्‍या एका किड्याची जोपासना मोठ्या प्रमाणात करून त्यांना वावरात मोकळीक देण्यात आली.
3.       पाने गुंडाळणार्‍या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ट्रायकोग्रामा कायलोनिस नावाच्या किड्यांची योजना करण्यात आली.
4.       भातावरच्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी मशागतीच्या काळात संध्याकाळी शेताच्या बांधावर मशाली पेटवण्यात आल्या.
5.       चिंगुळ्या किंवा सारडीन माशाच्या शरीरातील अमिनो आम्ल आणि गूळ यांच्या द्रवाच्या फवारणीमुळे भात किडींना निर्बल करण्यात आले.

3. सिकल पेशींमुळे आदिवासींच्या वाट्याला काय येते?

भारतात अनेक आदिवासी व्यक्तिंच्या शरीरात लाल रक्तपेशी वेगळ्या आकारात असल्याचे आढळून येते. सामान्यपणे लाल पेशींचा आकार मेदूवड्याच्या आकारासारखा फुगीर पण मध्ये चपटा असा असतो. लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन नावाचा एक लाल रंगाचा घटक असतो. हिमोग्लोबिनचे वैशिष्ठ्य म्हणजे तो ऑक्सिजन पकडून शरीराच्या आतल्या भागात गरजेप्रमाणे वाहून नेऊ शकतो. फुप्फुसाताल्या वायूकोशांच्या आतल्या जाळ्यांमध्ये गेल्यावर हिमोग्लोबिन तेथील ऑक्सिजन पकडून ठेवतो. त्याचे काम शरीरातील पेशी पेशी पर्यंत जाऊन तेथे ऑक्सिजनचा पुरवठा करणे. तेथे असणार्‍या ग्लूकोस या इंधनाच्या अतिमंद ज्वलन क्रियेसाठी हा ऑक्सिजन पुरवला जातो. या ज्वलनातून शरीरात ऊर्जा तयार होते. त्यातून आपल्या शरीराची विविध कार्ये होतात. काही आदिवासींच्या रक्तामध्ये काही लालपेशी गोलाकार नसतात, जरा चपट्या आणि वाकड्या असतात. साधारणपणे खुरप्याच्या आकाराच्या असतात म्हणून त्यांना सिकल पेशी असे म्हणतात. या पेशींची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता सामान्य पेशींपेक्षा कमी असते. अशा सिकल पेशी शरीरात अधिक असतील तर ‌अॅनिमिया तथा पंडुरोग होतो. रक्ताची लाली कमी होते. रक्तपेशी चिकट होतात. अशक्तपणा येतो. त्यातूनच कधी कावीळही होते तसेच अन्य आजार होण्याची शक्यता बळावते.

शरीरात लाल पेशींऐवजी सिकल पेशी तयार होतात. लाल पेशींच्या रचनेत हिमोग्लोबिन सारखेच असणारे बीटाग्लोबिनही वापरले जाते. या बीटाग्लोबीनची जागा व्हेलिन या द्रव्याने घेतली की पेशी गोलाकार होण्याऐवजी चपटी, वाकडी, खुरप्याच्या आकाराची होते. याला अनुवंशिकता हे कारण आहे. आई आणि बाप यांपैकी कोणाच्याही शरीरात सिकल पेशी असतील तरी त्यांना होणार्‍या बाळाच्या शरीरात सिकल पेशी होऊ शकतात. आई आणि बाप या दोघांच्याही शरीरात सिकल पेशी असतील तर त्यांना होणार्‍या बाळाच्या शरीरात सिकल पेशी होतातच. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी सिकल पेशी आहेत का याची तपासणी करणे गरजेचे असते. असे थॅलॅसिमिया अँड सिकल सेल सोसायटीच्या सुमन जैन यांनी सांगितले.  
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, तेलंगण, आंध्र, केरळ, पश्चिम बंगाल, आसम अशा राज्यांच्या डोंगराळ भागात राहणार्‍या आदिवासींमध्ये सिकल पेशी असण्याबाबत एक विस्तृत पाहणी केली गेली.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्युनोहेमॅटोलॉजीने केलेल्या पाहणीत असे आढळले की – सर्वात जास्त सिकल पेशी असणारे आदिवासी केरळ राज्यात १८ ते ३४% आहेत. त्या खालोखाल आंध्र आणि तेलंगणात ११ ते ३४%, मध्य प्रदेशात १५ ते ३३% आदिवासींमध्ये सिकल पेशी आहेत. आंध्र – तेलंगणातल्या खम्मम, वारंगल, मेहबूबनगर, पूर्व गोदावरी, श्रीकुलम, विशाखापट्टणम या जिल्ह्यांमध्ये आदिवासींमध्ये सिकल पेशी आढळून येतात. आता या राज्यातून आदिवासी आश्रम शाळांमधून शिक्षण घेणार्‍या सर्व सव्वादोन लाख विद्यार्थ्यांची पहाणी करायचे राज्य सरकारने ठरवले आहे.

या पार्श्वभूमावर सिकल पेशींबाबत झालेल्या आणखी एका अभ्यासाचीही दखल घेतली पाहिजे. जबलपूर येथील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ रिसर्च इन ट्रायबल हेल्थ – या आदिवासींच्या आरोग्याबाबत संशोधन करणार्‍या संस्थेतील संशोधकांना – सिकल पेशी असण्यामुळे आदिवासींचा हिवतापापासून बचाव होतो असे आढळून आले आहे.

डासांच्या डसण्यातून हिवतापाला कारणीभूत ठरणारे – प्लास्मोडियम फेल्सिपेरम हे जंतू शरीरात टोचले जातात. त्यांच्यामुळे हुडहुडी भरून बराच ताप येतो आणि रोगी आजारी पडतो. डॉ. ज्ञानचंद यांच्या निरीक्षणानुसार – “सिकल पेशी असणार्‍या व्यक्तिंमध्ये हिवतापाच्या जंतूंचा प्रादुर्भाव झाला तरी त्यांना रोग होत नाही किंवा झाला तरी त्याची लक्षणे आणि त्रास कमी होतो. सिकल पेशी हिवतापाच्या जंतूंना कैद करून ठेवतात. त्यामुळे सिकल पेशी असणारे लोक हिवतापाचा मुकाबला करू शकतात.”
डॉ. ज्ञानचंद यांनी आपल्या म्हणण्याचा ठोस पुरावाही सादर केला. आदिवासींमध्ये हिवतापाच्या जंतूंची लागण झाली आहे का याची तपासणी केली असता ७८% आदिवासींच्या शरीरात प्लास्मोडियम फेल्सिपेरम हे जंतू असल्याचे आढळले, मात्र त्यापेकी हिवतापाने आजारी पडण्याचे प्रमाण अतिशय थोडे आढळले, हिवतापाने मृत्यू झालेली आदिवासी व्यक्ती अगदीच विरळा.
सिकल पेशींमुळे पंडुरोग होत असेल तरी हिवताप टळतो असे दिसते.
आदिवासी वनांमध्ये राहतात तेथे डासांचे किंवा माणसाचे रक्त शोषून जगणार्‍या कीटकांचे प्रमाण खूपच असते त्यामुळे त्यांपासून होणार्‍या हिवतापासारख्या रोगांपासून संरक्षण होण्यासाठी सिकल पेशी निसर्गत:च झाल्या नसतील?
समुद्रसपाटीपासून उंच जाऊ तसतशी हवा विरळ होत जाते. ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होत जाते. अशा ठिकाणी आदिवासी अधिक प्रमाणात आढळतात आणि त्यांच्यात सिकल पेशींचे प्रमाणही जास्त असते. सिकल पेशी जास्त आणि कमी ऑक्सिजन यांच्यात काही संबंध – जीवन जगण्याला अनुरूप असा असल्याचे संशोधन कोणी केले असेल का?
भारतात ४५७० मीटर उंचीपर्यंत आदिवासींची वसती आढळते, जिथे ऑक्सिजनचे प्रमाण समुद्रसपाटीच्या प्रमाणाच्या जवळजवळ निम्म्याइतके असते.

उंची(मीटर)
उंची(फूट)
ऑक्सिजन%
0
0
20.9
500
640
19.6
1000
3281
18.4
1500
4921
17.3
2000
6562
16.3
2500
8202
15.3
3000
9843
14.4
3500
11483
13.5
4000
13123
12.7
4500
14764
11.9
5000
16404
11.2
5500
18045
10.5
6000
19685
9.9
6500
21325
9.3
7000
22966
8.7
7500
24606
8.2
8000
26247
7.7
8500
27887
7.2
9000
29528
6.8

२. न्यूयॉर्कमधील शाळांत विद्यार्थ्यांना मोफत नाश्ता!

न्यूयॉर्क शहराच्या महापौरांनी शहरातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना रोज वर्गात आल्या आल्या मोफत नाश्ता देण्याची योजना जाहीर केली. २००६ पासून गरीब विद्यांर्थ्यांना मोफत नाश्त्याची, दुपारच्या भोजनाची योजना सुरू केली. मध्यम उत्पन्न असणार्‍यांना हीच योजना अल्प दरात तर संपन्न असणार्‍यांना यथोचित दरात सुरू केली होती. त्याच्या आढावा घेतल्यानंतर आता प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही योजना २०१५ पासून लागू राहाणार आहे.

गेल्या वर्षी न्यूयॉर्कमधील ११ लाख विद्यार्थ्यापैकी ७५% विद्यार्थी मोफत नाश्ता मिळण्यास पात्र होते. मात्र त्यापैकी १४% विद्यार्थ्यांनीच या योजनेचा लाभ घेतला होता. नाश्ता ताजा, स्वच्छ आणि पोषक असूनही लाभार्थी कमी का – याचा शोध घेतल्यावर असे दिसले की – एक तर अनेक विद्यार्थ्यांना आपण गरीब असल्यामुळे आपल्याला ही सवलत मिळते ती घेण्याचा संकोच होताना आढळले. दुसरी बाब म्हणजे शाळेचे कामकाज सुरू होण्याआधी शाळेच्या उपहारगृहात जाऊन नाश्ता घेण्यासाठी घरून लवकर निघणे भाग पडायचे. या दोन कारणांचे परिमार्जन करण्यासाठी सर्वांनाच आणि शाळा सुरू झाल्यावर लगेच मोफत नाश्ता द्यायचा असे ठरवले. तसा तो यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून देण्यात येईल. यामध्ये विद्यार्थ्यांची सोय झाली.

शिक्षकांना याबाबत विचारले असते ८५% शिक्षकांनी या योजनेचे स्वागत केले. भुकेल्यापोटी शिकणे नीट होत नाही – असे अनेकांचे निरीक्षण आहे. काही शिक्षक भुकेल्या विद्यांर्थ्यांना आपल्या खिशातून रक्कम खर्च करून खाऊ घालतात. यासाठी दरमहा सरासरी ११० डॉलरपर्यंत खर्च शिक्षक करतात असे आढळले आहे.

शिक्षण तज्ज्ञांच्या मतेही रिकाम्या पोटी शिकवण्याचा अट्टाहास करण्याने विद्यार्थ्याला समजून येण्यात अडथळा येतो आणि त्याच्या शहाणपणात होणारी वाढ खुंटते. शिवाय शिक्षणावर झालेला खर्च वाया जातो, कारणी लागत नाही हे कारणही महत्त्वाचे.

न्यूयॉर्कने शालेय नाश्ता-भोजन उपक्रमावर गेल्या वर्षी ३७ कोटी डॉलर खर्च केले. महापौरांच्या सांगण्यानुसार यापैकी ३० कोटी डॉलर सरकारांकडून खर्चाची भरपाई म्हणून मिळाले. त्यात मध्यवर्ती सरकारचा वाटा मोठा आहे, राज्य सरकारनेही काही वाटा उचलला. यंदापासून या योजनेतील सर्व गरीब मुलांवर होणारा खर्च मध्यवर्ती सरकार पूर्ण भरून देणार आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आणि घरातील लोकांची संख्या यांची दखल घेऊन त्यांची गरीबी ठरवण्यात आलेली आहे. कुटुंबात चार व्यक्ती असतील आणि वार्षिक उत्पन्न ४४,१२३ डॉलर असेल तर ते गरीब गणले जातील आणि घरात सहा व्यक्ती असतील आणि वार्षिक उत्पन्न ५९,१४५ डॉलर असेल तरी त्यांना गरीबच मानले जाईल. आठ व्यक्ती आणि उत्पन्न ७४,१६७ डॉलर तरी गरीबच गणले जाणार. केवळ उत्पन्नाचा आकडा पाहून गरीबी ठरवत नाहीत

शहरातील जितके जास्त गरीब विद्यार्थी या योजनेत सामील होतील तितका जास्त वाटा मध्यवर्ती सरकार उचलेल. गेल्या वर्षी १४३ शाळा सहभागी झाल्या होत्या, यंदा ४६१ शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत.

नाश्त्याला वाराप्रमाणे रोज वेगवेगळे पदार्थ असतील. कधी ऍपल सायडर, डोनट, मक्याचे मफिन तर कधी फळे, ताकाची बिस्किटे, टर्की सॉसेज पॅटीस असेल कधी गाजराचा पाव तर कधी लाह्या आणि दूध असेल. कधी टेक्सास फ्रेंच टोस्ट, तर कधी गरम सफरचंद मफीन असेही पदार्थ असतील. धान्य, प्रथिने, फळे आणि दूध याच्या वापरातून पोषक द्रव्यांचा समतोल साधलेला असेल. मात्र चीज पीझ्झा, जमैकन बीफ पॅटीस अशासारखे मेद वाढवणारे पदार्थ नाश्त्याला दिले जाणार नाहीत.
·         वर्गात नाश्ता दिल्यामुळे वर्ग घाण होणार नाही का? असे विचारले असता – नाही, उलट त्यामुळे स्वच्छता राखण्याचे धडे गिरवता येतील असा विचार शिक्षकांनी व्यक्त केला.
·         नाश्ता खात असण्याचा वेळ शिक्षणाच्या वेळातून वगळला तर अभ्यासक्रम पूर्ण होण्याचा वेळ कमी पडणार नाही का? या प्रश्नावर शिक्षक म्हणाले की - आम्ही तो वेळ हजेरी घेणे, नोंदी करणे, काही सूचना देणे वगैरे कारणांसाठी वापरू शकू, तो वाया कसा जाईल?
·         काही जण घरून नाश्ता करून आले असतील तर त्यांना हाही नाश्ता मिळाल्यामुळे उपाय व्हायच्या ऐवजी त्याचा जाडेपणाच वाढायचा. त्याबद्दल काही करता येईल का? या वर एक आहारतज्ज्ञ म्हणाले की – अशा विद्यार्थ्यांचे वजन करून त्यांना ते जाडेपणाकडे जात आहेत असे दाखवून डबल नाश्ता खाण्यापासून परावृत्त करता येईल. केमोथेरपीमुळे काही त्रास होत असतील म्हणून ती बंद केली तर मूळ कर्करोग बळावायला आपण संधी दिल्यासारखे होईल. काही जण डबल नाश्ता करण्याची शक्यता लक्षात घेतली तरी लाखो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे हे विसरून चालणार नाही.

याबाबत अनेक सामाजिक संघटनाही पुढे येऊन सहकार्य करत आहेत. आपली मुले ही आपल्या देशाची साधनसंपत्ती आहेत, आपली ताकद आहेत ती सर्वांच्या सहकार्यांने सर्वांसाठी तयार होईल असे बघितले पाहीजे असे भूकविराधी चळवळीतले एक कार्यकर्ते म्हणाले.

न्यूयॉर्कमधील हा उपक्रम पुढील तीन वर्षांसाठी चालवला जाणार आहे. त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल.
मध्यवर्ती सरकार गरिबांच्या नाश्त्याचा होणारा खर्च पूर्ण देणार आहे.

काही जणांना हा उपक्रम पसंत नाही. त्यात १५% शिक्षकही मोजता येतील. ‘गरीबांचे लाड’ कशाला असे म्हणणारेही लोक आहेतच. त्यात एक असाही विषय निघाला की शनिवारीही शाळा नसताना ज्यांना हवे त्यांच्यासाठी हा उपक्रम चालू राहू शकेल का? त्याबद्दल काही सकारात्मक विचार चालू आहे. यावर एकाची वरकडी करणारी सूचना – काही विद्यार्थ्यांना घरी एकटी आजी सांभाळते, अशांसाठी शाळेतच “बेड टू ब्रेकफास्ट” व्यवस्था करावी!

हे काही अपवाद वगळता बहुतांश न्यूयॉर्कवासीयांनी या उपक्रमाला भरभरून पाठींबा दिला आहे. अमेरिकी पद्धतीने विचार आणि आचार करून हा उपक्रम अंमलात आणला जाईल, त्याची आकडेवारी कोणालाही इंटरनेटवर बघायला मिळेल, उपक्रमाचे सतत समालोचन होईल, जरूर तर त्यात काही बदलही होतील आणि हा उपक्रम अयोग्य आहे असे आढळले तर तो सोडून द्यायलाही अमेरीकी मन संकोच करणार नाही. शहराचे कारभारी, राज्य आणि मध्यवर्ती सरकारे वेळच्या वेळी रकमा खर्च करायला देतील आणि अधिकारीही त्यात आपली “चिक्की खाणार नाहीत” असा विश्वास तिथल्या जनतेला आहे.

असा विश्वास ठेवता येणारे सरकार आणि अधिकारी जगात सर्वांना मिळावेत.

Household Size*
Maximum Income Level (Per Year)
1
$21,590
2
$29,101
3
$36,612
4
$44,123
5
$51,634
6
$59,145
7
$66,656
8
$74,167


१. अमरनाथ यात्रेत शीतपेये आणि ‘सटरफटर’ खाद्यावर बंदी --- 
२८ जून २०१५
अमरनाथ यात्रेमध्ये - कोका कोला सारखी शीतपेये आणि विविध प्रकारचे वेफर्स सारखे तळलेले सटरफटर खाद्यपदार्थ -  खाण्यावर या वर्षीपासून बंदी घालण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन यंदापासून करणार असल्याचे संबंधित अंमलदाराने सांगितले. २ जुलै २०१५ पासून सुरु होणार्‍या अमरनाथ यात्रेत सामील होणार्‍यांनी याची दखल घ्यावी म्हणून ही माहिती देण्यात आली आहे.
२०१२ मध्ये अमरनाथ यात्रेतल्या अनेक यात्रेकरूंना शीतपेये आणि सटरफटर खाद्यपदार्थ सेवन केल्यामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले. याची दखल सर्वोच्च न्यालयाने घेतल्यानंतर तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात आली. यात्रेकरूंना समुद्रसपाटीपासून ३००० मीटर उंचीवरून प्रवास करावा लागतो. इतक्या उंचीवर हवा विरळ असते त्यामुळे श्वासावाटे शरीराला मिळणार्‍या प्राणवायूचे प्रमाण कमी होते. प्राणवायूच्या कमतरतेमुळे शीतपेये आणि हे तळकट सटरफटर पदार्थ पचण्याच्या क्रियेत अडथळे येतात आणि त्यातून शरीरात दूषित पदार्थ तयार होऊ शकतात. त्यांच्यामुळे श्वासोच्छ्वासातही अडथळा निर्माण होऊ शकतो. असे समितीतील तज्ज्ञांचे मत असल्याचे ‘श्री अमरनाथ भाविक मंडळा’चे उपप्रमुख कार्यकारी अधिकारी पंकज आनंद यांनी म्हंटले आहे. २०१३ आणि २०१४ मध्येही अशा प्रकारचा बंदी आदेश लागू केला होता पण यंदा त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे असे घोषित करण्यात आले आहे. यात्रेच्या वाटेत यात्रेकरूंच्या खाण्याची सोय करण्यासाठी ‘लंगर’ उभारणार्‍यांनी आपण वितरीत करत असलेल्या अन्नाची यादी देणारे फलक - दिसतील असे लावावेत, अशा सूचना त्यांना देण्यात आल्याचे पंकज आनंद यांनी सांगितले आहे.

अमरनाथ यात्रेकरूंना नैसर्गिक कारणाने अशा समस्येला तोंड द्यावे लागते. आपल्यालाही अनेकदा प्रदूषणामुळे – शरीरात प्राणवायूच्या कमतरतेच्या प्रसंगाला सामोरे जावे लागते, तसेच दम्यासारखे श्वसनसंस्थेचे काही आजार असणार्‍या माणसांनांही शरीरात प्राणवायूच्या कमतरतेची समस्या उदभवते. अशा वेळी लोकांनी शीतपेये टाळणे आणि सटरफटर तळकट पदार्थ टाळणे हितकर असणार!
-    किती प्रदूषण झाले तर ही विदारक परिस्थिती येते याबद्दल कोणी संशोधन केले आहे का?
-    अशा प्रकारे मृत्यूलाही सामोरे जाणे भाग पडेल अशी वेळ येऊ शकणार्‍या लोकांची यादी कोणी केली आहे का?
-    तशी शक्यता असेल तर अशा लोकांनी जाणते-अजाणतेपणे मृत्यू कवटाळू नये म्हणून कोणते नियम शासक करणार आहेत का?


जरा खट्याळपणे म्हणायचे तर अशीही उत्सुकता आहे की – या बंदीमुळे ‘नेहमीप्रमाणे हिंदूंवरच अन्याय’ झाल्याचा आवाज कोणी उठवणार नाही ना?