Sunday, October 11, 2015

पूर्वजांप्रती कृतज्ञता Paying respect to ancestors

राजस्थानी भाषेतील वर्षाज्ञान...

 भारतात सर्वात मोठे वाळवंट असणारा प्रदेश म्हणजे राजस्थान. मरूभूमी असणारा निम्म्याहून अधिक भाग. नैऋत्य-ईशान्य पसरलेला अरवली पर्वत. महाराष्ट्रात उत्तर-दक्षिण पसरलेला मोसमी पावसाला आडवा असणारा सह्याद्री कोकणात भरपूर पाऊस पाडतो. मध्य प्रदेशात पूर्व-पश्चिम पसरलेले विंध्य आणि सातपुडाही मोसमी पावसाला बरसायला लावतात. राजस्थानात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून आलेले बाष्पयुक्त वारे पाऊस होऊन अरवली पर्वतापर्यंत पोचेस्तोवर कफल्लक झालेले असतात. अशा ढगांमधून अरवलीच्या आसऱ्याने पडणारा पाऊस राजस्थानला मिळणार. त्यामुळे कदाचित राजस्थानच्या सर्वच भागात पाण्याच्या थेंबाथेंबाला किंमत आहे. पावसाला, सूर्याला, ढगांना, वाऱ्याला म्हणूनच राजस्थानी भाषेत विविध छटांचे शब्द आहेत – संज्ञा आहेत. संज्ञा म्हणजे – उच्चाराशी संयुक्त असणारे ज्ञान करून देणारे शब्द.

या मरूभूमीतल्या लोकांच्या भाषेत – ‘माटी’, ‘वर्षा’ आणि ‘ताप’ हे केवळ शब्द नाहीत तर त्यांच्या संस्कृतीचे साधे सरळ असणारे विविध पदर आहेत. जीवनाचा सरळपणा आहे, ताप आहे तसा थंडावाही आहे. राजस्थानी भाषेतल्या संज्ञा आपल्याला ‘हवामान’शास्त्राची उकल करून देतात.

‘फागुन’ (फेब्रुवारी – मार्च) महिन्यापासून त्याची तयारी चालू होते. सूर्याचे तापणे हा पावसाळ्याची सुरूवात मानली जाते. या काळात लोक एकमेकांच्या अंगावर पिवळाभक्क अबीर आणि लालभडक गुलाल उधळतात. वाळवंटाचा देव श्रीकृष्णदेखील गरमीच्या काळात पिवळी वाळू हवेत उडवतो असे मानतात.

‘चैत’ (मार्च – एप्रिल) येतो आणि सगळी जमीन तापायला लागते. सूर्य आग ओकत चटके बसायला लावत असतो. बाकी सारे लोक याला उकाडा, उन्हाळा म्हणतात. राजस्थानात त्यालाच ‘पिठ’ म्हणतात. मराठी भाषेत कोजागिरीचे चांदणे ‘पिठुर’ असते. राजस्थानात ऊनही ‘पिठ’ असते. या भागात पिठ या शब्दाला अनेक अर्थ आहेत त्यातला एक अर्थ पाणी, जल असाही आहे. एका अर्थाने सूर्य हा जलचक्राचा स्वामी आहे म्हणून तो पावसाचाही स्वामी आहे.

‘आसाढ’ (जून – जुलै) आला की सूर्याभोवती एक खळे दिसत राहाते, त्याला राजस्थानी भाषेत ‘जलकुंभो’ म्हणतात म्हणजे त्याला पाण्याचा साठा मानतात. तो जितका जास्त दिसेल तितके पाऊसमान जास्त. या काळात उगवतीच्या सूर्याकडे लक्ष ठेवतात. सूर्यापासून ‘मछलो’ म्हणजे माशाच्या आकाराचा किरण येताना दिसला की पाऊस येण्याची शक्यता असल्याचे अनुमान करतात. या बाबतीत चंद्राचाही वेध घेतात. ‘आसाढ’ महिन्यात चंद्रकोर उभी नांगरासारखी दिसली तर पावसाळा चांगला जाणार. मात्र ‘श्रावण’ महिन्यातली चंद्रकोर उभट नको आडवी - पडलेली असली पाहिजे, तर पावसाळा चांगला जाणार.
‘उभो भलो आसाढ, सुतो भलो श्रावण’

राजस्थानात पावसाच्या अंदाजाबद्दल सांगणारे एक ‘भाडळी पुराण’ आहे. त्यात ‘जलकुंड’, ‘मछलो’ आणि चंद्र यांचे उल्लेख वारंवार येतात. हे पुराण ‘डांक’ या महान ज्योतिष्याने लिहीले असे सांगतात. आकाशातल्या प्रकाशमान वस्तूंना ज्योती म्हणतात त्यांचा अभ्यास करणारी व्यक्ती ज्योतिषी. डांकच्या बायकोचे नाव ‘भाडळी’ होते. भाडळी शब्द बादल – भादल – भाडळ – भाडळी असा बदलत गेला असावा. डांकचे लक्ष सतत ढगांकडे असल्यामुळे त्याचे लग्न ‘भाडळी’शी होणे तसे संयुक्तिकच ! जनमानसात डांक आणि भाडळी यांचे नाते अतूट आहे, त्यामुळे लोकांत ‘डांक भाडळी पुराण’ चालत आले असावे.

या भागात ढग कमी दिसत असल्यामुळे असेल कदातिच पण विविध ढगांना विविध नावांनी ओळखतात. ढगांची अनेक रूपे असतात त्यानुसार बादल शब्दाचीही अनेक रुपे होतात, त्यांना पुल्लिंगी नावे आहेत तशी स्त्रीलिंगी नावेही आहेत – ‘वादल’, ‘वादली’, ‘बद’, ‘बदली’. काही नावे संस्कृत नावांच्या जवळची देखील आढळतात – ‘जलहर’, ‘जलधर’, ‘जलवाह’, ‘जलधरण’, ‘जलद’, ‘जिमुत’, ‘घटा’, ‘विकसर’, ‘सारंग’, ‘व्योम’, ‘व्योमचर’, ‘मेघ’, ‘मेघअंबर’, ‘मेघमाला’, ‘मुदिर’, ‘महिमंडल’ इत्यादी. बोली भाषांमध्ये तर ढगांच्या नावांची रेलचेलच आहे उदा. – ‘भरबाड’, ‘पाथोड’, ‘डाबर’, ‘डांबर’, ‘दलवादल’, ‘धान’, ‘घनमांद’, ‘जलजाई’, ‘कालीकंथाल’, ‘कालाहन’, ‘कारायण’, ‘कंद हब्र’, ‘मैंमत’, ‘मेहाजल’, ‘मेघन’, ‘माहघन’, ‘रत्न्यो’, ‘सेहेर’ इत्यादी. ढगांना इतकी नावे आहेत की एका वर्षभरात तितके सगळे ढग दिसतात की नाही अशी शंका यावी. त्यातून कोणाला नवनव्या नावांची कल्पना सुचली तर भाषेत आणखी भर पडते.

ढगांच्या नावांची यादी या चाळीसांवर थांबत नाही. ढगांचे आकार, प्रकार, चलन आणि वर्तन यांवरूनही ढगांना नावे आहेत. अवाढव्या ढगाला ‘सिखर’ म्हणतात तर चित्र काढल्यासारख्या छोट्या छोट्या पुंजक्यात पसरलेल्या ढगांना ‘चित्री’ म्हणतात. पुंजक्यातून अलग होऊन एकट्या पडलेल्या ढगालाही वेगळे नाव आहे - त्याला‘चुँको’ म्हणतात. दूरून येणाऱ्या पाण्याने भरलेल्या पावसाच्या ढगांच्या टोळीला ‘कोलायन’ म्हणतात. हे काळे ढग येण्याआधी येणाऱ्या पांढऱ्या झेंड्यासारख्या ढगाला‘कोरण’ म्हणतात तसेच‘कागोलर’ असेही एक नाव आहे. मात्र या पांढऱ्या ढगाचे निशाण नसता आलेल्या काळ्या ढगांना ‘कंथाल’ असे नाव आहे तसेच‘कालायन’ असेही एक नाव आहे.

ढगांच्या आकाशातील उंचीवरून त्यांचे वर्णन करणारी नावे आहेत तसेच त्यांच्या हालचालीच्या वेगावरूनही ढगांना नावे दिली आहेत. उंचावर असणाऱ्या ढगांना‘कास’ किंवा‘कासवड’ म्हणतात. कमी उंचीवर असणाऱ्या आणि नैऋत्येकडून ईशान्येकडे जाणाऱ्या ढगांना‘उंब’ म्हणतात. दिवसभर आकाश झाकोळून टाकणाऱ्या आणि अधून मधून पावसाचा शिडकावा करणाऱ्या ढगांना ‘सहद’ म्हणतात. पश्चिमेकडून वेगाने येणाऱ्या ढगांना‘लोरण’ म्हणतात आणि त्यांच्यातून पडणाऱ्या पावसाला‘लोरणझार’ म्हणतात. या‘लोरणझार’चे गुणगान करणारी किती तरी लोकगीते आहेत.

पाऊस पाडून झालेल्या म्हणजे आपली कर्तव्ये बजावलेल्या आणि विश्रांतीसाठी डोंगराच्या माथ्यावर विसावलेल्या ढगांना म्हणतात ‘रिंची’ कदाचित हे ऋषी मानले गेले असावेत.

 ‘जेठ’ महिन्यात (मे – जून) अकराव्या दिवशी ‘नौताप’ सुरू होतो. साधारणपणे मे महिन्यातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात तो येतो. ‘नौताप’ किंवा ‘नवताप’ म्हंटल्या जाणाऱ्या या काळात धरणी उन्हाने तापून निघते. ती तापली पाहिजे नाही तर पावसाळा चांगला येत नाही. हे दिव्य व्रतस्थपणे पार पाडले तरच पुढे पावसाने येणारा थंडावा प्राप्त होणार.

‘ओम-गोम’ म्हणजे आकाश आणि धरती यांच्यातले आंतरीक नाते जसे ब्रह्म आणि त्याची रचना यांच्यातले आंतरीक नाते. कडकडीत ऊन देणाऱ्या सूर्याचे नामकरण ‘थम’ म्हणून केले आहे. राजस्थान प्रमाणे बिहार, उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेश यांमध्येही हे नाव वापरले जाते. परंतु ‘ओघनिओ’ नावाचे अतिशय प्रखर कडकडीत ऊन फक्त राजस्थानातच पडते. याच काळात ‘बालटी’  या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाळवंटात ‘लूं’ नावाची गरम झालेल्या वाळूमातीची वादळे अंगाची लाही लाही करत असतात. त्याच्यामुळे - जनजीवन अस्तव्यस्त – झाल्याच्या, रेल्वे आणि सडकांवर वाळूचे थर साठून त्यांवरून चालणारी वाहतूक बंद पडल्याच्या बातम्या आपल्याला ऐकायला वाचायला मिळतात. मात्र इथले लोक हा सारा तापदायक प्रकार म्हणजे ‘ओम-गोम’चा एक अविभाज्यच नव्हे तर आवश्यक हिस्सा असल्याचे मानतात. त्यामुळे वाळवंटातले कोणीही रहिवासी ‘जेठ’ महिन्याला शिव्याशाप देत नाहीत. या काळात चेहरा वगळता बाकी सारे अंग लपेटून घेऊन इथले लोक वावरतात. चेहेऱ्यावर उडत येणाऱ्या गरम वाळूचे चटके शांतपणे सहन करतात. एवढंच नाही तर गाई-गुरे, म्हशी, उंट, शेळ्या-मेंढ्या पाळणारे समूह आपापल्या पद्धतीने ‘जेठ’ पाठवल्याबद्दल देवाचे आभार मानत गाणी गातात. त्या गाण्यात म्हणतात – जेठ मिनो आयो रे -
जेष्ठाचा महिना आला आहे,
दक्षिणेकडून वारा वाहायला लागला आहे,
वाळूगोट्यांच्या खुळखुळ्यांचे आवाज कानात गुंजत आहेत,
देवा तुझे उपकार आहेत.

असे म्हणतात, की वर्षाचे बारा महिने जेव्हा एकत्र जमतात आणि बोलत असतात, आपणच निसर्गाचे कसे श्रेष्ठ पुत्र आहोत असे सांगत असतात अशा कोणत्याही बैठकीत शेवटी एकच महिना श्रेष्ठ ठरतो तो म्हणजे जेष्ठ. तो सर्वांचा ‘असेजेतु’ म्हणजे दादा ठरतो. जेठ पेटला नाही, तापल्या वाळूच्या वादळांनी सगळे झाडले नाही, तर ‘जमानो’ म्हणजे पावसाळा येणारच नाही. ‘जमानो’  म्हणजे नुसता पावसाळाच नाही तर पाऊस, मशागत, पीके आणि चारा यांचे योग्य संतुलन म्हणजे ‘जमानो’. याच काळात सुर्याच्या ‘पिठ’ नावाचा अर्थ बदलून पाणी होतो. ‘औगळ’ हे पावसाचे पहिले लक्षण. ‘दिदोरिया’च्या आवाजाने लहान मुले आपापल्या दऱ्या घेऊन पसरतात आणि मग मोठे लोक त्या साफ करायला पुढे येतात.

पाऊस येण्याआधी घराची छपरे, अंगणे आणि पाणी साठण्याच्या सगळ्या जागांची सफाई करतात. या काळात ‘जेठ’ सरत असतो आणि ‘आसोद’ यायचा असतो, पावसाळा अजून लांबच असतो. ‘आसाढ’च्या अकरा दिवसांनंतर ‘वर्साली’ किंवा ‘चौमासा’ येणार असतो. राजस्थानात पाऊस तुरळक असला तरी लोकांनी त्या लाडक्यासाठी वर्षातले चार महिने दिले आहेत.   
ढगांना इतके जवळून ओळखणाऱ्या, त्यांची जाण आणि त्यांच्याबद्दल आस्था असणाऱ्या; नावाने, कामाने आणि अगदी विश्रांतीनेही ओळखणाऱ्या या लोकांमध्ये ढगांमधून पडणाऱ्या पावसाच्या थेंबांनाही वेगवेगळी लाडाकोडाची नावे नसतील तरच नवल !

पावसाच्या पहिल्या थेंबाला ‘हरि’ नावे म्हणजे देवाच्या नावे ओळखतात. ढगाचे फूल म्हणजे ‘मेघफुआ’ म्हणून ओळखतात. ‘वृष्टी’ आणि ‘बिरखा’, ‘व्रखा’ अशा शब्दांमधून निघालेली अनेक नावे आहेत. ‘बादल का सार’, ‘घनसार’, ‘मेवेलियो’, ‘बुला’, ‘सिकर’ म्हणजे पाण्याचे कण. ‘फुआर ’ म्हणजे फवारा आणि ‘छिंटा’ म्हणजे पावसाची धूळ हे शब्द तर सरसकटपणे वापरात आहेत. यापासून निघालेले शब्द म्हणजे ‘छंटो’, ‘छंटा-छरको’, ‘छछाओ’. टपकणे या क्रियापदापासून निघालेले शब्द म्हणजे ‘टपका’, टपको’, ‘टिपो’. तसेच ‘झरमार’, ‘बूंदाबांदी’, ‘पुनांग’ आणि ‘जिखा’ हे शब्दही पावसाच्या विविध प्रकारच्या थेंबांचे वर्णन करण्यासाठी वापरले जातात. टपोऱ्या थेंबांच्या पावसाला म्हणतात ‘रिठ’ किंवा ‘बोठ’. खूप वेळ पाऊस पडत असेल तर त्याला म्हणतात ‘झारमंडन’. श्रावण भाद्रपदात पडणारा सर्वसाधारण पाऊस असतो ‘हालूर’. थंड वातावरणात छोट्या थेंबांनी भुरभुरतो तो ‘रोहार’. ‘वर्षावली’ किंवा ‘वरखावल’ हाही पावसाचा एक प्रकार. जोरात आणि घनघोर पडणाऱ्या पावसाला म्हणतात ‘महाझार’. जोरात पण थोडाच काळ पडणारा पाऊस म्हणजे ‘झपको’. अतिप्रंचड प्रमाणात पडणाऱ्या पावसालाही नावे आहेत – ‘त्रात’, ‘रामझाँड’, ‘त्राटकानो’, ‘धारहरानो’.
यालाच ‘छोल’ हा शब्द जोडला की त्यातून आनंददायकता दिसून येते. आकाश आणि जमीन यांना कवेत घेणारा दूरदूर पसरलेला पाऊस असेल तर त्याला म्हणतात ‘धारावली’ किंवा ‘धारोलो’.

पावसाचा अल्लडपणा वेगवेगळ्या नावांनी व्यक्त होतो. ‘धारोलो’ घरात आला की त्याला म्हणतात ‘बाकब्बार’ आणि या बाकब्बारच्या दमटपणामुळे मऊ झालेल्या घरातल्या कापडचोपडांना विशेषण लावतात ‘बचारवायो’. ‘धारोलो’चा आवाज म्हणजे ‘धमक’ आणि त्याला घेऊन येणारा वारा म्हणजे ‘वाबल’. ‘वाबल’ हळुहळू कमी होत जातो, ‘धमक’चा आवाज कमी होत जातो, जमीन भिजवून ‘धारोलो’ शांत होतो, पण अजूनही हवा पावसाळीच आहे अशा वेळी सूर्य ढगांआडून दिसायला लागतो, त्याला म्हणतात ‘मोघ’. मोघ आहे म्हणजे पाऊस अजून पडणार आहे. एखादी रात्र सततधार पावसाची असेल तर तिला म्हणतात ‘महारैना’.

‘तुथनो’ या क्रियापदाचा अर्थ आहे – बरसणे आणि ‘उब्रेलो’ म्हणजे पाऊस संपत येण्याची क्रिया, ‘चौमासा’ संपत येण्याची खूण. पावसाचे थेंब म्हणजे ‘पालार’. पहिल्या थेंबापासून शेवटच्या थेंबापर्यंतचा थेंब अन् थेंब पकडून घेण्यासाठी प्रत्येक वस्तीत, गावात, खेड्यात, पाड्यात, पावसाळ्याच्या छपरावर अंगणात चादरी पसरून ठेवलेल्या असतात. अगदी चौकाच्या कडेला, शेतात आणि मोकळ्या मैदानातही. या विविध प्रकारांनाही ढग आणि थेंब यांच्यासारखीच अनेक नावे आहेत. हे सगळे सुंदर धडे कोणत्या शाळेच्या पुस्तकात पहायला मिळत नाहीत पण सामाजिक सामूहीक स्मृतीत जतन करून ठेवलेले असतात त्यातूनच श्रुती निर्माण होतात. हे सारे काम कोणी सुरू केले कोणाला माहिती नाही म्हणूनच ते सांगोसांगीतून म्हणजेच श्रुतींतून पिढ्यांपिढ्या सतत सरकत आले आहे. हे कार्य कोणा राजासाठी थांबलेले नाही ना कोणा सरकारसाठी ना कोणा कंपनीसाठी त्यांचा आपल्या हातांवर भरवसा आहे – हे सर्वांचे ‘निजी’ कार्य आहे. आपल्या श्रमातून, कष्टातून आणि मेहनतीतून केलेले निजी कार्य मग सर्वांसाठी सर्वांनी केलेली सर्वांसाठीची ‘पिंडवारी’ ठरते. घामाचे थेंब गाळल्यानंतर पाण्याच्या अमृताचे थेंब सर्वांना चाखायला मिळतात.


अनुपम मिश्र यांनी लिहीलेल्या - ‘राजस्थान की रजत बूंदे’ - या पुस्तकातील एका अध्यायावरून भाषांतरीत. भाषांतर– विनय र. र.  

पूर्वजांप्रती कृतज्ञता ही जागतिक भावना --
·         भारतात - महाराष्ट्रात पितृपंधरवडा होतो सर्वपित्री अमावस्या होते तसा कर्नाटकात म्हाळ किंवा म्हाळवस, तामिळनाडुत आदि अमावसायी, केरलमध्ये करिकडा वावुबली अशा सणांद्वारे पूर्वजांना आदरांजली वाहातात.
·         नेपाळमध्ये ऑगस्ट – सप्टेंबरच्या दरम्यान गायजात्रा म्हणजे गावभर गाय फिरवून गोदानाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडले असे मानतात
·         लाओस, थायलँडमध्ये उल्लंबन म्हणतात. तेथील महायान आणि थेरवादी बौद्ध लोक तो पाळतात.
·         कंबोडीयात प्रचुम बेंडा हा दिवस त्यासाठी पाळतात. खेमर कालगणनेतील दहाव्या महिन्यातला पाचवा दिवस. या दिवशी सर्व लोक संध्याकाळी बुद्धविहारात जमतात. येताना भात, मासळी घेऊन येतात. पूर्वजांच्या नावे लिहीलेली निमंत्रणे त्यांचा नावाचा पुकारा करून आगीत जाळतात. त्यावर आपण आणलेला भात घालतात, मासळी घालतात.
·         कोरीयात यालाच सेवालाल म्हणतात. चार पिढ्यांपर्यंतचे मृतात्मे वंशाशी जोडलेले असतात असे मानतात विशिष्ठ वाणाचा भाताचा पिंड करून वाहातात त्याला सोंग पियॉन असे नाव आहे. येथे फक्त पुरूषच हे कार्य करतात.
·         मलेशियामध्ये माह मेरी जमातीचे लोक अरी मोयांग नावाने हे कार्य करतात.
·         विएतनाम मध्ये थान मिन्ह या नावाने पितरांना आठवण्याचे दिवस घातले जातात.
·         चीनमध्ये गेल्या २५०० वर्षांपासून क्विंग मिन्ह नावाने हे दिवस साजरे करतात. तेथे हे दिवस एप्रिलच्या पहिल्या पंधरवड्यात येतात. त्या काळात तेथे पाऊस असतो, सुगी असते.
·         जपानमध्ये पर्वेकडील भागात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तर पश्चिमेकडील भागात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवस यासाठी देतात. या दिवसांना ओबोन ओमात्सुरी म्हणतात. पूर्वजांसाठी आकाश कंदिल लावतात. दिवे पाण्यात सोडतात, तिसर्‍या दिवशी तीरो नागाशी – विशेष अन्नपदार्थ करतात.
·         इंग्लंडमध्ये ही पद्धत १५३६ पासून सुरू झाली. या काळात पूर्वजांच्या थडग्यांची डागडूजी करतात. त्यावर आरास करतात.
·         जर्मनीत एर्नटं डांक फेस्ट हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असतो.
·         रोम मध्ये लेम्युलारिया हा तत्सम सण आहे.
·         मादागास्कर बेटांमध्ये दर सात वर्षांनी पूर्वजांची प्रेते उकरून त्यांचे कपडे बदलतात.
·         हैती देशात वुडू धर्मीय लोक पूर्वजांचे स्मरण करतात त्या दिवसांचे नाव आहे – जोर दे औक्स. आपल्या पूर्वजांचे मृतात्मे मानव आणि देव यांच्यात संवाद सांधण्याचे काम करतात असे ते मानतात
·         मेक्सिकोमध्ये ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात – दिआ द ला मुरतोस – हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे.
·         अमेरिकेत युरोपीय वंशजांसाठी मे मधला शेवटचा सोमवार मनवतात तर सप्टेंबरमधला शेवटचा रविवार आदिनिवासी अमेरिकी पूर्वजांसाठी.
·         ऑल सोल्स डे नावाने अनेक देशांमध्ये पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.


याशिवायही अनेक देशांमध्ये, लोकसमूहांमध्ये ‘पितरं घालण्याच्या’ पद्धती असू शकतील. बहुतेक सर्व सभ्यतांमध्ये पूर्वजांची आठवण करण्याची प्रथा आहे. त्यात रूढ असलेल्या कृती वेगवेगळ्या आहेत असे दिसते. ते ते स्थानिक लोक त्या त्या कृती त्या त्या दिवसात केल्या नाहीत किंवा त्यांना जमले नाही तर हळहळत असतील, पाप लागले असे म्हणत असतील. जगभर रूढी वेगवेगळ्या आहेत त्यामुळे त्या न केल्याबद्दल – पाप – लागायचेच असेल तर सगळ्यांनाच पाप लागणार कारण कोणीच जगातल्या सर्वच्या सर्व रुढी पाळत नाहीत. रुढी कालानुसार बदलतात पण आपल्या जन्माला कारण असणार्‍यांबद्दल कृतज्ञ राहाण्याची भावना मात्र सर्वांच्यात शाबूत दिसते. - विनय र. र.