Friday, April 1, 2016

The life is beautiful जीवन सुंदर आहे...

ध्वनिप्रदूषण जागरण दिवस

हवा प्रदुषित झाली की आपल्याला जाणवते. घाण वास येतात, धूर-धुळ-धुरके यांनी आसमंत भरून जातो. डोळे चुरचुरतात, नाका-डोळ्यातून पाणी येते. गुदमर होते. कधी चक्कर येते, मळमळते कधी बेशुद्धीही येते. पाणी प्रदुषित झाले की त्याची नितळता जाते, विचित्र रंग येतो, ते प्यावेसे वाटत नाही, तसेच प्यायलो तर पोटात ढवळते, उलट्या जुलाब होतात, विकार होतात. ज्यांचे परिणाम माणसाला भोगावे लागतात, आरोग्य बिघडते त्याला प्रदूषण म्हणतात.

ध्वनीप्रदूषणाबाबत काय? आपल्या कानावर कर्कश आवाज येत राहिले की त्याचा आपल्यावर परिणाम होतो. कारखान्यात यंत्रांच्या कोलाहलात काम करणाऱ्या कामगारांना, बांधकाम कामगारांना, बस, ट्रक अशा अवजड वाहने चालवणाऱ्यांच्या कानावर विपरित परिणाम होतात. वयाच्या मानाने त्यांचे कान म्हातारे, बहिरे झालेले आढळतात. तुम्हीही तुमच्या कानांची तपासणी तुमचा स्मार्ट फोन वापरून करू शकता. आपल्या कानांचे वय काय? (How old are you ears?) असा प्रश्न ‘गुगल’ करून तुम्ही आपल्या श्रवणशक्तीची चाचपणी केव्हाही करून घेऊ शकता. सिनेमागृहात सिनेमा पाहून किंवा एखाद्या लाऊडस्पिकर लावलेल्या समारंभात, ऑर्केस्ट्रात, डिस्कोत, दांडियात, मिरवणुकीत ढणढणाटी आवाज ऐकून 2-3 तासांनी बाहेर आलात की पुन्हा आपल्या कानांची परिक्षा घेऊन पहा. तुम्हाला कानाने कमी ऐकू येत असल्याचे दिसून येईल. हा परिणाम तात्पुरता असेल काही तासात पुर्वीप्रमाणे नीट ऐकूही येईल. मात्र कर्कश आवाजात सतत वावरणाऱ्यांना आपली श्रवणक्षमता कमी होत होत गमवावी लागते.

हवा आणि पाणी प्रदूषणाच्या मानाने ध्वनिप्रदुषणाचे परिणाम दिसायला काही काळ जावा लागतो. अनेक बस वा ट्रक चालकांचा डावा कान बहिरा होतो. कारण वाहन चालवताना त्यांना वाहनाच्या उजव्या बाजूला बसावे लागते.
मिरवणूकीत 4-5 तास ढोल-ताशे वाजवण्यासाठी पथकाचा सराव 3-4 महिने आधीपासून सुरू होतो. अशा वादकांनी आपल्या श्रवणशक्तीची नियमित पहाणी करून घ्यावी. 3-4 वर्षानंतर त्यांच्या श्रवणशक्तीत कमी आल्याचे निरीक्षणे सांगते. दुसरे काय बोलतात हे आपल्याला आलेल्या बहिरेपणामुळे लक्षात येत नाही, त्यामुळे रोजच्या जगण्यात, व्यवहारात कित्येक अडचणी येतात. कमी ऐकू येणारे मोठ्या आवाजात बोलतात असे आपल्याला आढळून आले असेल. गोंगाट असलेल्या जागी एकमेकांशी संवाद साधतांना ओरडून बोलावे लागते. ओरडून बोलणाऱ्यांच्या घशावर ताण येतो, श्वासावर अवाजवी जोर द्यावा लागतो, धाप लागते, रक्तदाबही वाढतो. वारंवार गोंगाटात असणाऱ्यांना रक्तदाबाबरोबर हृदयविकारालाही तोंड द्यावे लागते. प्राणी, पक्षी, बालके, पस्तीशीपुढचे लोक, गर्भार स्त्रिया आणि गर्भांनाही सततच्या गोंगाटाचा त्रास होतो.गर्भार स्त्रियांना आणि गर्भालाही सततच्या गोंगाटाचा त्रास होतो. विमानतळाजवळ राहणाऱ्यांमध्ये गर्भपाताचे तसेच दिवस भरण्याआधी बाळंत होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.

1986 पर्यंत आपल्याला ध्वनिप्रदूषण हा शब्दही माहिती नव्हता. 1986 साली भारतात प्रदूषण नियंत्रण कायदा आला. त्यात हवा, पाणी, जमीन यांच्यात होणाऱ्या प्रदूषणाप्रमाणे गोंगाटाला ध्वनीप्रदूषण मानले गेले. हवा, जमीन पाणी प्रदूषण करणारे घटक कोणते, त्यांचे मोजमाप कसे करायचे याबाबत काही नियम करण्यात आले. त्यांची प्रदूषणे टिकतात त्याप्रमाणे ध्वनीप्रदूषण टिकत नाही. त्या क्षणी आवाजाची पातळी मोजली नाही तर ती नंतर मोजता येत नाही. तुमच्या गल्लीतले ध्वनीप्रदूषक ढणाढणा लाऊडस्पीकर वरून आवाज करून गुन्हा करत असतील तेव्हा तुम्ही पोलिसात तक्रार केली आणि पोलिस तिथे पोचायच्या आत लाऊडस्पीकर बंद करण्यात गुन्हेगार यशस्वी झाले तर त्यांच्यावर काही गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाही कारण ध्वनी प्रदूषणाचा पुरावाच पोलिसांना मिळत नाही. पोलिस गेले की पुन्हा ढणाढणा लाऊडस्पीकर बोंबलणार आणि तुम्ही त्या गुन्हेगारांच्या ब्लॅकलिस्टमध्ये जाणार. अशा प्रकारे गुन्हेगारांविरोधात पोलिसांकडे तक्रार करणारेच बळीचे बकरे होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातून तक्रादारांचे खून पडतात आणि त्यांचे खुनी ’अज्ञात’ इसम असतात.
आपण आपल्या स्मार्ट फोनवर ध्वनीपातळी मोजण्यासाठी Noise Meter सारखे ऍप सहजपणे डाऊन लोड करून घेऊन ध्वनिप्रदूषण मोजू शकता. जगात विविध लोकांनी केलेली संशोधने लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने निवासी क्षेत्रात दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबल ही सोसवणारी ध्वनिमर्यादा असल्याचे जाहीर केले आहे. त्यापेक्षा अधिक आवाज हा आरोग्याला घातक म्हणून प्रदूषण करणारा आणि शिक्षेस पात्र व्हायला हवा. व्यापारी क्षेत्रात +10 तर औद्येगिक क्षेत्रात +20 इतक्या आवाज वाढीला सवलत दिली आहे. आपल्या इथल्या समारंभात आवाजाची पातळी अनेकदा 100 ते 120 इतकी जबरदस्त असते. अशा पातळीत राहणाऱ्यांची कार्यक्षमता आणि विवेक-विचारशक्ती घसरते. दारूड्याची घसरलेली कार्यक्षमता त्याला आणि त्याच्या कुटुंबियींना भोगावी लागते मात्र आवाज चढवण्याच्या उत्सवभक्तांच्या नशेची किंमत सर्व समाजाला मोजावी लागते.

सध्याच्या काळात कोणते सण नाहीत अशा वेळी आपण आपल्या स्मार्ट फोन वरून आवाजाची पातळी मोजलीत आणि तिने मर्यादा पार केली असेल तर? त्याचे महत्वाचे कारण वाहतूक असू शकते. हे लक्षात घेऊन वाहन उत्पादक आपल्या वाहनात सुधारणा करत आहेत. साध्या बसचा - प्रवाशांना आणि बाहेरच्यांना येणारा आवाज आणि व्होल्वोसारख्या बसमुळे आतल्या आणि बाहेरच्या लोकांना येणारा आवाज यात लक्षणीय फरक आहे हे तुम्ही अनुभवले असेल. उत्पादकांनी संशोधकांच्या मदतीने यंत्रांचा आवाज कमी करण्यात यश मिळवले आहे. मात्र त्यांनी वाहनाला लावलेला हॉर्न न वापरून शांतता राखणे केवळ आपल्याच निर्धारावर अवलंबून आहे.

लोकशाहीत नागरिकांना जे अनेक अधिकार आहेत त्यात ‘प्रत्येकाला शांततेत राहण्याचा अधिकार’ दिलेला आहे. त्याची अंमलबजावणी करून या अधिकारांचे हनन करणाऱ्यांवर कारवाई करणे ही जबाबदारी राज्य शासनाची आहे.

जागरूक नागरीक म्हणून आपण प्रदूषण टाळून आपल्या आणि समाजाच्या आरोग्याचे रक्षण करणे, लोकांच्या आरोग्याप्रती गुन्हेगारांना शासन होईल असे कायदे सरकारने करणे आणि त्यांची अंमलबजावणी प्रशासनाने करणे यांची विशेषत: आवाजाच्या बाबतीत आठवण करून देण्यासाठी एप्रिलमधला चौथा बुधवार ध्वनीप्रदूषण जागरण दिवस म्हणून जगभर पाळला जातो.
या वर्षी 25 एप्रिल हा दिवस आहे. त्या दिवशी आपण ध्वनिप्रदूषणाच्या दुष्परिणामांबद्दल बोलले पाहिजे. स्वत: ध्वनीप्रदूषण करणार नाही आणि इतरांनाही त्यापासून परावृत्त करेन हा निर्धार केला पाहिजे.

विनय र. र. 9422048967


रंगात रंग..

निसर्ग एकीकडे या दिवसांत

  • मनमुक्त रंगपंचमी खेळत असतो,
    आणि आपण रंग खेळायचा नाही,
    रंगायचं नाही म्हटल्यावर हिरमोड होतोच.
    पण पाणीटंचाईच्या काळात
    पाण्याची नासाडी करत रंग खेळणंही चूकच!
    त्यावर उपाय काय?
    अशा रंगात रंगायचं जे निसर्गच देतो,
    बादलीभर अंघोळीच्या 
    पाण्यातही ते धुऊन निघतात,
    नाही धुतले तरी चालतात!
    पण असे रंग शोधायचे कुठं?
    आपल्याच घरात!!
    लहान मुलं एक खेळ खेळतात ‘डाली बत्ती लावत जाव’ असे राज्य घेतलेला मुलगा म्हणतो आणि कुठल्यातरीे झाडाचे नाव सांगतो. लाल पत्ती लाव जाव म्हटलं की सगळी मुलं लाल पत्रीच्या झाडावरून लाल पत्री आणून त्याला देतात. मग दुसरे, तिसरे, चौथे अशी अनेक झाडांचा, त्यांच्या रंगांची, फुलांची, फळांची, पानांची ओळख लहानपणी होते. ती विसरली की मग रंगांसाठी बाजारावर अवलंबून राहायला होते. चार रुपये टाकले की भरपूर रंग मिळतो, तो एकमेकांना फासायलाही काहीे वाटत नाही.
    उन्हाळ्यात होळी-रंगपंचमी हे सण येतात. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असते. दुष्काळी वर्षांमध्ये ती आणखीनच तीव्र असते. मग काही जागरूक नागरिक सर्वांना सांगतात- होळी, रंगपंचमी खेळू नका, पाणी वाया घालवू नका. त्यांचं हे म्हणणं चुकीचं नाही. 
    पण हेही खरं की, याच काळात सर्वांना निसर्गात वृक्षांकडून प्रगट होणाऱ्या रंगांच्या उधळणीचा आविष्कार आकर्षित करीत असतो. इतर वेळी ज्या वृक्षांकडे लक्षही जाणार नाही असे अमलताश, गुलमोहोर, नीलमोहोर, पाटलाची सून, पळस, पांगारा असे विविध वृक्ष आपल्याला त्यांच्याकडे बघायला लावतात. पुन्हा पुन्हा बघायला लावतात. त्यांच्या फुलांच्या पाकळ्यांचे रंगही किती आकर्षक. भगवा, अबोली, कितीतरी रंग, याशिवाय सूर्याच्या वाढत्या ऊर्जेमुळे जुन्या पानांचे ज्येष्ठ पोक्त असे पिवळे-तपकिरी रंग, तरण्या पानांचे हिरवे पोपटी रंग आणि उमललेल्या पर्णकुटांचे लाल, तांबूस, विटकरी रंग.. निसर्गात रंगांच्या उठावाचा असा इशारा असल्यावर माणूस तरी काय करणार? 
    होळी ते रंगपंचमीच्या या पाच दिवसांत रसरशीत रंगात रंगून जाण्याची ओढ लागणारच की!
    एकीकडे ही ओढ आणि दुसरीकडे पाण्याची तंगी, दुष्काळ, होरपळ. काय करणार? 
    मन स्वस्थ बसू देत नाही. 
    पाणी तर वाचवलंच पाहिजे.
    पण आपल्या मित्रमैत्रिणींना रंगात रंगवलं पाहिजे, रंगलेलं पाहिलं पाहिजे, आणि स्वत:ही रंगलं पाहिजे. 
    पण कसं?
    हे जमावं कसं? ऐन दुष्काळात पाणी नासवून रंग खेळायला मन मानत नाही, कारण ते चुकीचंच आहे. पाण्याची नासाडीही करायची नाही आणि रंगही मनसोक्त खेळायचे असं काही करता येईल का?
    असे रंग वापरता येतील का, की ज्यांना फारसं पाणी लागणार नाही? 
    असे रंग वापरता येतील का, जे धुवून काढून टाकायला लागणार नाहीत?
    मुळात हे प्रश्न आपल्याला पडायचं कारणच हे की आपण होळीला/रंगपंचमीला असे रंग वापरायला सुरुवात केली की जे खरं तर अंगाला लावण्यासाठी तयार झालेलेच नाहीत. कारखान्यात तयार झालेले हे रंग भिंती रंगवण्यासाठीचे आहेत. लाकडी आणि लोखंडी सामान रंगवण्यासाठी आहेत. हो आणि अर्थातच काही प्लॅस्टिक, नायलॉन रंगवण्यासाठी आहेत. ते अंगाला लागले की चामडीला त्रास होणारच! 
    फिनाईलाने फरशी, संडास, बाथरूम चांगली धुतली जाते म्हणून फिनाईलने अंघोळ कराल तर काय होईल? चामडी काळवंडून जाईल.
    तेच या रंगांचंही! 
    कारखान्यात बनलेले रासायनिक रंग त्रास देणारच! 
    मला प्रश्न पडतो, निसर्ग रंगांची उधळण करतो ती कशी दिसते?
    - मनमोहक दिसते. आकर्षक दिसते. प्रत्येक रंग खुलून उठून दाखवणारी असते. 
    आपण दुसऱ्याला रंगवतो ते कसे? 
    रंगांची उधळण कसली मिसळण करतो आणि रंगांची दुनिया बहारदार करण्याऐवजी विद्रूप करतो. आॅईलपेंट फासतो, सिल्व्हरपेंट, डांबरी रंग फासतो आणि त्यातून ते काढायला भरपूर पाणी वापरतो. त्वचारोग ओढवून घेतो. डोळ्यात रंग गेला तर आंधळेपण ओढवून घेतो.
    आपण एकमेकांना विद्रूप नको करायला. रंगांनी सजवून रंग उधळ्यापेक्षा रंग लावू या. फुलांच्या पाकळ्यांच्या माळा, गुच्छ, गोंदे असेही करता येईल. एकमेकांना घालता येतील. दुनिया रंगीबेरंगी आहे. प्रत्येक रंगाच्या वस्तूला शेजारपाजारच्या रंगाच्या वस्तू खुलवतील असे रंग लावू. मजाही करू, आरोग्यही आणि पाणीही वाचवू!!
    रंगपंचमी खऱ्या अर्थानं साजरी करू..!
    !