झुरळाचा महिमा वर्णावा किती!!

झुरळ! नाव ऐकताच चेहऱ्यावर किळस आणि तोंडातून “शीsss:” असा आवाज बाहेर पडतो. घरात दिसलं की झाडू किंवा चप्पल हातात येते आणि “मार मार”चा गोंधळ उडतो. पण या छोट्या प्राण्याबद्दल आपल्याला खरंच काय माहिती आहे? फक्त घाण, रोग आणि किळस?
खरं तर झुरळे ही निसर्गाची एक अद्भुत रचना आहे. त्यांचे गुण समजले तर कोणीही दुसऱ्याला “झुरळ” म्हणून हिणवणार नाही. उलट, आदराने डोळे भरून बघेल!
शारीरिक ताकद तर झुरळांची अफाट आहे. जगातली सर्वात कठीण प्राणी म्हणून ते गणले जातात. अणुबॉम्बसारख्या विकिरणातही ते जिवंत राहू शकतात. एका अभ्यासानुसार, मानवाला १००० रॅड विकिरणाने ठार मारता येईल, तर झुरळाला १००,००० रॅडचीही फिकीर नाही!
बेबीताईच्या घरी एक दोन झुरळे दिसली. ती मारायला चप्पल आणि मानसिक ताकद अपुरी पडणार हे त्यांना जाणवलं. मग त्यांनी - हाण - नावाचं झुरळांचं औषध आणून रात्री फवारलं. सकाळी सगळं घर झाडून काढलं तर झुरळांच्या प्रेतांनी शंभरी ओलांडलेली. ती किळसवाणी घाण गेल्याचा आनंद घरात भरून राहिला. एक दोन महिने गेले. घरात पुन्हा एक दोन झुरळं दिसली. बेबीताई मिस्कील हसल्या. रात्री - हाण - ची फवारणी झाली. सकाळी शेकड्यांनी झुरळांची प्रेते नायनाट होऊन पडलेली त्यांना स्वप्नात दिसली. सकाळी उठल्यावर त्यांनी सगळं घर झाडून काढलं, शेकड्यांनी नाही तर फवारणी मारल्याला मान देण्यासाठी दोन झुरळांची प्रेतं मिळाली. बाकी झुरळांना - हाण - चा झटका सोसण्याची ताकद मिळाली होती. अशी आहे झुरळांची जबरदस्त प्रतिकारशक्ती!
झुरळांचा शिरच्छेद केला तरी काही दिवस ते चालू शकतात. पाण्याखाली ३०-४० मिनिटे सहज राहतात. भूक लागली तर एक महिनाभर उपाशी राहू शकतात. अशा या ‘टर्मिनेटर’ प्राण्याला आपण चप्पल मारतोय! हाय!
पर्यावरणात झुरळांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ते ‘निसर्गाचे कचरा संकलक’ आहेत. मृत प्राणी, सडक्या भाज्या, कागद, लाकूड — जे काही सडतंय ते खाऊन ते मातीला पुन्हा उपयुक्त पोषक द्रव्ये देतात. जंगलात, शेतात, निसर्गात ते विघटकाचे - डिकम्पोजरचे काम करतात. त्यांच्याशिवाय पर्यावरणाचे चक्र बिघडेल. पक्षी, सरपटणारे प्राणी, सरडे यांच्यासाठी ते नैसर्गिक अन्न आहेत. एका अर्थाने झुरळे ही निसर्गाची ‘स्वच्छता कर्मचारी’ आहेत, ज्यांना आपण घाणेरडे म्हणतो!
औषधी उपयोग तर आणखी आश्चर्यकारक. पारंपरिक चिनी औषधांमध्ये (TCM) शेकडो वर्षांपासून झुरळांचा वापर होतो. पोटाचे अल्सर, जखमा, श्वसन समस्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासाठी त्यांचा अर्क वापरला जातो. आधुनिक संशोधनातही झुरळांमधील प्रोटीन आणि पेप्टाइड्समुळे नवीन अँटिबायोटिक्स आणि व्रण भरून काढणारी औषधे तयार होत आहेत. कॅन्सर उपचारातही त्यांच्या काही घटकांवर संशोधन सुरू आहे. आमचे दिक्षित आजोबा दिक्षित आजींना रात्री दम्याचा त्रास सुरू झाला की चहा करून देत. त्यात स्वयंपाकघरात आडवळणीला लपून राहिलेलं एखादं झुरळ टाकून छान झु-टी करत आणि आजीबाईंनी तो प्यायला की त्यांची ढास कमी होत असे. म्हणजे हा ‘घाणेरडा’ प्राणी खरं तर ‘जीवनदायी’ ठरू शकतो! होमिओपॅथीमध्ये Blatta orientalis हे मुख्य औषध भारतीय झुरळापासून तयार केले जाते. श्वसन समस्या, अस्थमा, ब्राँकायटिस, खोकला, धाप लागणे यावर अतिशय उपयोगी आहे ते.
आणि झुरळाचे खाद्य गुण काय वर्णावे? पूर्व आशियात - थायलंड, चीन, व्हिएतनाम मध्ये झुरळे हा प्रोटीनचा राजा मानला जातो! फार्ममध्ये स्वच्छ वाढवलेली झुरळे तळून, भाजून स्नॅक म्हणून खातात. १०० ग्रॅम ड्राय झुरळात ५०-६५% प्रोटीन असते — बीफ किंवा चिकनपेक्षा जास्त! B12 व्हिटामिन, आयरन, कॅल्शियम, झिंक भरपूर. जगभरात प्रोटीनच्या कमतरतेच्या काळात हे ‘सस्टेनेबल फूड’ म्हणून प्रसिद्ध होत आहे. कमी जागेत, कमी खर्चात, कमी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात ते पैदा करता येते. भविष्यात आपल्या मुलांना प्रोटीन शेकऐवजी ‘झुरळ पावडर’ द्यायला लागेल तर नवल वाटू देऊ नका!
तुम्ही एखाद्या झुरळाच्या मागे लागला असाल आणि ते जीव घेऊन पळाले असेल, एखाद्या बंद दाराच्या इवल्याश्या फटीतून आपल्या डोळ्यांसमोर दिसेनासे झाले असेल. आणि तुम्ही – चला बरं झालं डोळ्याआड गेलं ना जाऊ दे – म्हणून निश्वासही टाकला असेल. हारवर्ड विद्यापीठातील संशोधक डॉ. कौशिक जयराम - या रोबो तज्ज्ञांनाही आधी कदाचित असंच वाटलं असेल. पण ते तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी झुरळाच्या हालचालींचा रीतसर अभ्यास केला. त्यात त्यांना झुरळाच्या अनेक गुणांचा शोध लागला.
फटीची उंची दीड सेंटीमीटर असो वा पाऊण सेंटीमीटर झुरळाचा पळण्याच्या वेगावर त्याचा कोणताच परिणाम होत नाही. कारण झुरळ आपले पाय वाट मिळेल तसे लांब-आखूड करू शकते.
सहाही पाय जमिनीवर टेकलेले असताना किंवा मोकळ्यावर पळताना झुरळांची उंची साधारणपणे अर्धा इंच किंवा सुमारे १२ मिलिमीटर असते, तर फटीतून जाताना झुरळांची उंची एक दशांश इंच किंवा अडीच मिलिमीटर इतकी कमी होऊ शकते.
म्हणजे तुम्ही ६ फूट उंचीचे झुरळ असाल तर सव्वा फुटांच्या फटीतून झटपट पळत जाऊ शकाल!
छोट्याश्या सापटीतून पळण्यासाठी एक सेकंदापेक्षाही कमी काळात झुरळे आपले बाह्यकवच निम्म्यापेक्षा कमी आकारात सामावून घेऊ शकतात. सर्व पाय फाकलेल्या अशा स्थितीत झुरळे दर सेकंदाला त्यांच्या शरीराच्या लांबीच्या २०पट इतक्या वेगाने पळू शकतात.
माणसाची उंची १८० सेंटीमीटर धरली तर माणसाला झुरळाच्या गतीने - सेकंदाला २० X १८० = ३६०० सेंटीमीटर म्हणजे ३६ मीटर जावे लागेल. याचा अर्थ दर तासाला किंवा ३६०० सेकंदांना – ३६०० X ३६ = १२९६०० मीटर म्हणजे ताशी वेग १२९.६ किलोमीटर !!!! सर्वात वेगवान धावपटूसुद्धा याच्या निम्म्या वेगानेच दौडू शकतो.
यातून धडे घेऊन बनवलेल्या रोबोमुळे मलब्याखाली अडकलेल्या माणसांना त्वरीत मदत मिळणे सोईचे होईल. इमारती कोसळून त्याच्य ढिगाऱ्याखाली अडकलेली माणसे असोत किंवा भूकंप, भूस्खलन, हिमनदीचा लोंढा यामुळे निर्माण झालेल्या ढिगाखाली दबली गेलेली माणसे असोत. हा झुरळगुणी रोबो ढिगाऱ्यातल्या फटींमधून आत जाऊन त्यांची खबर बाहेरच्या जगाला देईल. त्यांच्यासाठी कदाचित गरजेच्या वस्तूही पुरवू शकेल. अशी त्याची रचना केली आहे. या तळहातावर मावेल एवढ्या छोट्याश्या रोबोचे नाव आहे “क्रॅम – सीआरएएम - क्रॅम”. हा रोबो आपला आकार आक्रसवून छोट्याश्या सापटीतूनही लीलया जाऊ शकतो. त्याच्या वरच्या भागावर झुरळाचे पंख त्याच्या पाठीवर बसवल्यासारखे एका प्लॅस्टीकच्या तुकड्याचे आच्छादन बसवलेले आहे
कॅलिफोर्निया विद्यापीठातील एकात्मिक जीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. रॉबर्ट फुल म्हणाले की – “भूकंपात कोसळलेल्या ढिगावर जाताना त्यातील दगडविटा पक्क्या आधारावर आणि सुरक्षित आहेत ना हे तपासावे लागते. बहुतांश रोबोंना त्यात काही गम्य नसते. तसे रोबो या मलब्यात निरुपयोगी ठरतात. तसेच या ढिगाला अनेक भेगा आणि खळगे असल्यामुळे ढिगाखाली सुरक्षित आणि धडपणे जाणे हे वैशिष्ठ्य असलेला झुरळगुणी रोबोच इथे काही कामगिरी करू शकेल.” या चमूतील संशोधकांच्या मते त्यांनी केलेले रोबो अल्पमोली आणि बहुगुणी आहेत. अनेक संकट प्रसंगांमध्ये ते उपयुक्त ठरतील.
खरं तर झुरळे आपल्याला शिकवतात — ‘कठीण परिस्थितीतही टिकून राहा, उपयोगी ठरा, कुणाला त्रास देऊ नका. घरात आले तर फक्त नीट स्वच्छता ठेवा, पण त्यांना मारण्याची घाई करू नका. त्यांच्यातही जीवन आहे आणि तेही निसर्गाचा एक भाग आहे.
मग पुढच्या वेळी कोणाला “अरे, झुरळा” म्हणायचे मन झाले तर थोडं थांबा. हसत हसत म्हणा, “अरे, तू तर झुरळासारखा टिकाऊ, उपयुक्त आणि शक्तिशाली आहेस!”
कितीही उच्चपदस्थ व्यक्ती असतील तरी त्यांना सगळ्या विषयातली सगळी माहिती असेलच असे नाही. त्यामुळे ते कोणालाही अज्ञानाने - झुरळ - म्हणू शकतात. पण आता तुम्हाला झुरळाचे गुण माहिती झाले आहेत. मग वाटतंय ना - झुरळाचा महिमा वर्णावा किती... खरंच, किती वर्णावा!
विनय र र
बसेरा, काळकाई माळ,
मुक्काम पाले, पोस्ट वरोडी खुर्द
ता. भोर, जि. पुणे
412206
मो. 9422048967
vinay.ramaraghunath@gmail.com
No comments:
Post a Comment