मराठी रंगछटांची नावे
रंग किती असे विचारले की - सात रंग असे उत्तर चटकन येते. यातले प्राथमिक रंग आपल्याला सांगता येतात.
तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा - हे इंद्रधनुष्यात दिसणारे ढोबळ रंग बऱ्याच मराठी माणसांना माहिती असतात म्हणजे ओळखता येतात. काळा, पांढरा, करडा हे रंगही सांगता येतात. परंतु रंगांमध्ये अनेक छटा असतात. प्रकाशाची वारंवारीता बदलली की रंगछटा बदलते. असा रंगछटा किती असतील? शंभर? हजार? दहा हजार? एक लाख? एक कोटी? आपल्याला किती माहीती आहेत?
मानवी डोळा सुमारे १० लाख ते १ कोटी वेगवेगळ्या रंगछटा ओळखू शकतो. प्रकाशाची तरंग लांबी, गडद फिकेपणा यावरून आपल्याला रंगछटांमधला फरक समजतो
आपल्या डोळ्यात ३ प्रकारचे शंकू (cones) आहेत — लाल, हिरवा आणि निळा. प्रत्येक शंकू सुमारे १०० वेगवेगळ्या तीव्रता ओळखू शकतो. या तीनच्या मिश्रणामुळे लाखो छटा तयार होतात. प्रकाशाची तरंगलांबी (wavelength) थोडीशी बदलली तरी छटा बदलते. शिवाय प्रकाश किती तेजस्वी आहे (brightness) आणि किती शुद्ध आहे (saturation) यामुळेही छटा बदलतात.
आपल्याला किती माहीत आहेत? सामान्य माणसाला १० ते २० मुख्य रंग व काही छटा माहीत असतात. रंगांचे काम करणारे लोक चित्रकार, डिझायनर, रंगारी यांना शेकडो छटा ओळखता येतात आणि नावाने सांगता येतात. लाखो छटा आपल्या मेंदूला दिसतात, मात्र त्यांना वेगवेगळी नावे नसतात.
भाषा समृद्ध होण्यासाठी भाषेत अनेक शब्द किंवा संज्ञा असतात. संज्ञा म्हणजे ज्या उच्चारणाशी संयुक्त असलेले ज्ञान होते ती सं ज्ञा.
इंद्रधनुष्यातील ७ रंग हे फक्त ढोबळ विभाग आहेत. त्यांच्यामध्ये आणि बाहेर लाखो सूक्ष्म छटा आहेत. आपल्याला त्या दिसतात, पण नावाने फार थोड्याच माहीत असतात.
जेव्हा तरंगलांबी, HEX, RGB, CMYK यांसारखी आधुनिक मापने नव्हती, तेव्हा रंगांचे प्रमाणीकरण निसर्गातील वस्तूंच्या आधारे केले जात असे.
रंगाला एखाद्या विशिष्ट वस्तूशी जोडून ओळखले जात असे. जसे गुलाबी, डाळींबी, हळदी, अबोली, केशरी, शेंदरी, निळा, सोनेरी, गेरू अशी किती तरी नावे सांगता येतील. काही मोरपंखी सारखे संभ्रम निर्माण करणारे रंग पण आहेत. मोराच्या पंखात किंवा पिसात अनेक रंगछटा असतात निळ्या, पिवळ्या, हिरव्या मग नेमका मेरपंखी रंग कोणता? खरं तर या रंगाला मोरमानी किंवा मोरगळी रंग म्हणायला पाहीजे. आकाशी म्हणजे कोणत्या आकाशाचा? त्याशिवाय - चिंतामणी, पिरोजी, मखमली, किरमिजी, गवळा असे बिनवस्तुंचे रंग कसे ओळखायचे?
त्यासाठी रंगांचे नमुने कागदावर किंवा कापडावर रंगवून पुस्तके तयार करायला हवी आहेत. यामुळे एकसारखेपणा राखता येईल.
मराठीत रंगांचे प्रमाणीकरण - आजपर्यंत कोणत्याही सरकारी संस्था, विद्यापीठ किंवा मानांकन संस्थेने (Bureau of Indian Standards सारख्या) मराठी रंगनामांचे शास्त्रीय व प्रमाणित संकलन केलेले आढळत नाही. येवला, पैठण येथील पैठणी कारागीर विशिष्ट रंगांना पारंपरिक नावे वापरतात (चिंतामणी, रामा, विटकरी, आबोली इ.). ही नावे व्यवसायात प्रचलित आहेत, पण ती औपचारिक मानके नाहीत. काही मराठी शब्दकोश आणि शालेय साहित्यात रंगांची यादी दिली जाते, पण ती फक्त नावे व अर्थ यांपुरती मर्यादित असते. कोणतेही रंगमूल्य (value) दिलेले नसते.
मराठीत रंगांची समृद्ध पारंपरिक नामावली आहे, पण ती वैज्ञानिक पद्धतीने प्रमाणित (standardize) केलेली नाही.
जे काम आजवर झालेले नाही ते आपण का करू नये? त्यामुळे मला माहिती असलेल्या आणि झालेल्या रंगछटांची नावे लिहून काढली. सुमारे 125 नावे सापडली. ही कमी आहेत असे वाटते. लोकांच्या बोलण्यात, व्यवहारात यापेक्षा अधिक नावे असू शकतील.
आहेत ती नावे त्यांची रंगछटा आणि व्रर्णन येथे देण्याचा प्रयत्न केला आहे. तो पहावा आणि मराठीत रंगछटांचे प्रमाणीकरण व्हावे या कामात सहकार्य करावे अशी विनंती आहे. या कामी मधुगंधा दामले कडून प्रेरणा आणि सहकार्य मिळाले. अनेक चित्रकार मित्रांनाही हे पाठवले आहे.
महिलांना रंगछटा पुरुषांपेक्षा अधिक चांगल्या समजतात? अनेक अभ्यासांनुसार महिला पिवळा-हिरवा आणि लाल-हिरवा यांसारख्या छटांमधील फरक पुरुषांपेक्षा चांगल्या रीतीने ओळखतात. रंगांधत्व (Color blindness): पुरुषांमध्ये जास्त आढळते (सुमारे ८% पुरुष तर ०.५% महिला), कारण ते X गुणसूत्राशी संबंधित आहे. टेट्राक्रोमसी: काही महिलांमध्ये चार प्रकारचे शंकू (cones) असू शकतात. अशा महिला लाखो अतिरिक्त छटा पाहू शकतात. ही क्षमता पुरुषांमध्ये जवळजवळ आढळत नाही. अभ्यासांनुसार महिला रंगांसाठी जास्त आणि अधिक सूक्ष्म शब्द वापरतात पुरुष बहुतेकदा मूलभूत रंगनामे वापरतात. महिलांकडे शब्दसंपदाही चांगली असेत म्हणून रंगछटांच्या प्रमाणीकरणात महिलांचे योगदान जास्त असावे अशी अपेक्षा आहे. ब्लाऊजपिस मॅचिंगच्या दुकानात छान क्रमाने रंगछटा लावलेल्या असतात. तिथे महिला अचूकपणे रंग निवडतात. माझ्या निरीक्षणात या दुकानांमध्ये विक्रेते पुरूष मोठ्या प्रमाणात असतात. मराठी रंगांच्या प्रमाणीकरणात सर्वच मराठी स्त्री-पुरुषांचा सहभाग हवा आहे.
धन्यवाद - विनय र. र. (9422048967)
खाली दिलेले रंग पहा आणि तुमची मते द्या -