आपले मूल वैज्ञानिक कसे होईल?
चुकेल तो शिकेल
एखादा नवीन वैज्ञानिक शोध लागला किंवा विज्ञान दिन आला की अनेक पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी वैज्ञानिक व्हायला पाहिजे. पण आपला मुलगा किंवा मुलगी वैज्ञानिक दृष्टीकोनाने वागत असताना आपण त्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना?.
चुकेल तो शिकेल
एखादा नवीन वैज्ञानिक शोध लागला किंवा विज्ञान दिन आला की अनेक पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी वैज्ञानिक व्हायला पाहिजे. पण आपला मुलगा किंवा मुलगी वैज्ञानिक दृष्टीकोनाने वागत असताना आपण त्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना?.
आपल्या पाल्यांच्या
वाढीबद्दल अनेक पालक जागृत असतात. आपल्या पाल्यांना चांगला आहार देतात. चांगले
कपडे करतात, चांगली पुस्तक वाचायला देतात, चांगले अनुभव देतात, उत्तम शाळेत घालतात
आणि आपल्या पाल्याच्या आवडीनिवडी पुरवणं ही कामं अनेक पालक आपआपल्या परीने करत
असतात. त्या पालक आणि पाल्य दोघांनाही आनंद असतो. खेळ, खेळणी, आधुनिक इलेक्ट्रॉनिक
साधने देखील मुलांच्या हाती देतात. कधी कधी इलेक्ट्रॉनिक किंवा आधुनिक साधनांबाबत
असं पहायला मिळतं की पालकांपेक्षा ही छोटी मुले ही साधने हाताळण्यात तरबेज असतात.
तुमच्या मोबाईलचा पासवर्ड किंवा ठिपक्यांच्या रांगोळीसारखा पॅटर्न एक वेळ तुम्ही
विसराल पण तुमच्या मुलांना सहज लक्षात राहतो. ते त्याचा वापर करून तुमच्या न कळत
तुमचा मोबाईल वापरूही शकतात. त्यांच्याकडे ही हुशारी येते कुठून?
आपण जन्माला येताना
आपल्या मेंदूत अब्जावधी पेशी घेऊन जन्माला येतो. या पेशींना न्युरॉन म्हणतात.
आपल्याला जे जे दिसते, ऐकू येते, स्पर्शाला लागते, जे वास येतात, ज्या चवी लागतात त्या
त्या सर्व गोष्टी आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत
मेंदूपर्यंत जातात. ते अनुभव होत असताना न्युरॉनमध्ये जाळ्या विणल्या जाऊन
अनुभवांची कायमची नोंद मेंदूत होत असते. समजा आपण आयुष्यात पहिल्यांदा ड्रॅगन
फ्रूट खात असू तर आपल्याला कोणातरी त्या फळाचे नाव ड्रॅगन फ्रूट असल्याचे सांगते.
तो आवाज आपल्या कानातून मेंदूत जाऊन काही न्यूरॉनमध्ये त्याची नोंद होते. डोळ्याने
पहाताना ड्रॅगन फ्रूटच्या सालाचा गुलाबी रंग, पाकळ्यांसारखी रचना
याची नोंद मेंदूत होत. बोटांना झालेला ड्रॅगन फ्रूटचा ओलसर स्पर्श मेंदूत नोंदवला
जातो. मग साल सोलताना किती जोर लावायला लागतो हेही मेंदू नोंदवून ठेवतो. सालीच्या
आत खळीसारखा दिसणारा गर, खसखशीच्या दाण्यापेक्षाही बारीक काळ्या
बिया यांचं दिसणं, रंगरूप, स्पर्श, वास, चव यांची नोंद आपल्या
शरीरातील न्युरॉनमध्ये होते. आपण ड्रॉगन फ्रूटची फोड खातो तेव्हा जिभेला तिचा
स्पर्श होतो, गारपणा, चिकटपणा, चव याही गोष्टींची
नोंद न्युरॉनमध्ये होते. चव, स्पर्श, रंगरूप, आवाज, वास मेंदूत
वेगवेगळ्या भागातल्या न्यूरॉनमध्ये नोंदले जातात. मात्र त्या सर्वांची मिळून एक
सांगड घातली जाते. पुढे कधी ड्रॅगन फ्रूट बघितले किंवा शब्द ऐकला किंवा डोळे मिटून
त्याला स्पर्श केला किंवा कोणी फोड आपल्या तोंडात घातली तर आधीच्या अनुभवांच्या
बळावर जोडल्या गेलेल्या न्युरॉनच्या कोणता तरी एका भाग तार छेडल्यासारखा छेडला
जातो आणि त्याला जोडल्या गेलेल्या सर्व न्युरॉनमध्ये तो कंप पसरतो आणि आपल्याला
ड्रॅगन फ्रूटचे पुन्हा ज्ञान होते. अशा प्रकारे विविध वस्तूंच्या विविध
अनुभवांमधून सांघल्या गेलेल्या जोडण्या छेडल्या जातात आणि आपले ज्ञान व्यक्त होते.
आपण हुशार असल्याचे सिद्ध होते.
आपली मुलेही हुशार
व्हायची असतील तर काय करायला पाहिजे? तर मेंदूत होणाऱ्या
या जोडण्या एक म्हणजे भरपूर असल्या पाहिजेत, दुसरं म्हणजे त्या
पक्क्या व्हायला पाहिजेत आणि तिसरं म्हणजे त्यांना आणखी जोडण्या जोडल्या गेल्या
पाहिजेत.
मेंदूत होणाऱ्या
न्युरॉनच्या जुळण्या वाढण्यासाठी आपण आपल्या मुलामुलींना अनुभव घेण्यासाठी अनेक
संधी दिल्या पाहिजेत. अनेक पालक काही ना काही कारणांनी मुलामुलींना अनुभव घेऊ
द्यायला नाकारतात. अगदी लहान असताना मूल पेटलेल्या उदबत्तीकडे आकर्षित होत असते, तिच्यातून निघणारा
धूर, तिचा वास, उदबत्तीच्या टोकाला असणारा लालबुंद जळता
भाग त्याला दिसत असतो आणि त्याला त्या जळत्या टोकाला स्पर्श करायची ओढ लागते.
उदबत्तीला हात लागला तर चटका बसणार हे आपल्या मुलाला समजत नाही आणि त्याला तो बसू
नये म्हणून आपण प्रयत्न करत राहतो. स्स् हा… म्हणत त्याला रोखत
असतो. पण यामुळे धूर हातात पकडता येत नाही हेही शहाणपण अनुभवातून मिळण्यापासून आपण
आपल्या बाळाला रोखत असतो. चटका बसायला नको पण उदबत्तीच्या धुराशी खेळायला मिळेल -
हे कसं साधायचं - यात आपली हुशारी दिसून येईल. बघा बाळाला वाढवताना
आपलीही वाढ होते की नाही?
तर आपल्या
मुलांमुलींना अनेक अनुभव घेण्याची संधी आपण मिळू दिली पाहिजे. तर त्यांचा मेंदूत
अनुभवसंपन्न जोडण्यांची जाळी निर्माण होतील. हे अनुभव मिळवून देण्यासाठी मुलांना
सोबत घेऊन आपल्या रोजच्या जगण्यात करता येण्यासारख्या किती तरी गोष्टी आहेत. घरात
स्वयंपाक करत असताना त्यांना सोबत घेऊन बघा. समजा सायीचे दही घुसळून त्याचे ताक
करायचे आहे. हे काम करताना रंग रूप, वास, स्पर्श, आवाज अशा गोष्टींचे अनुभव तर
येतीलच पण लोणी का तरंगते असा प्रश्नही तुमच्या मुलामुलीच्या मनात येईल. तो
त्यांनी विचारला की तुम्ही त्याचे उत्तर द्या की लोणी ताकापेक्षा हलके असते म्हणून
तरंगते. आता त्या पुढे जाऊन कोणत्या गोष्टी हलक्या आणि कोणत्या जड आहेत हे
ओळखण्यासाठी तुमच्या पाल्याने पाण्याचा वापर केला की तो झाला हुशार आणि त्याचे
वैज्ञानिक कुतूहलही वाढलेच ना? इथं तुम्ही त्याला मोकळीक नाही दिलीत तर त्याचे
कुतुहल कोमेजेल आणि बुद्धीमत्ताही खुंटेल. ही वाईट गोष्ट व्हावी असं तुम्हाला
नक्कीच वाटत नसणार.
तर तुम्ही आपल्या
मुलाबाळांना अनुभव मिळू देण्याच्या संधी द्याल अशी मला आशा आहे. त्याही पुढे जाऊन
अशा संधी अनेक वेळा द्यायला हव्यात. कारण एकदा आलेला अनुभव पुन्हा पुन्हा आला तर
त्याच्या मेंदूतल्या न्युरॉनच्या जोडण्या पक्क्या होतील. समजा तीच कृती करताना तोच
अनुभव पुन्हा आला नाही तर? तर त्यात काही बिघडत नाही. उलट त्यामुळे आपली चूक काय
झाली हे शोधायला तुमचे मूल उद्युक्त होईल. अर्थात त्यासाठी तुमच्याकडे थोडी
सहनशिलता हवी. कदाचित काही नुकसान झाले तरी ते सोसायची तयारी ठेवायला पाहिजे. तसे
काही ग करता – चुकीला क्षमा नाही – म्हणत तुम्ही मुलाला शिक्षा केलीत तर त्याची
समजूत अशी होईल की प्रयोगातून शिकता येत नाही तर शिक्षा येते. अशा प्रकारे
वागणाऱ्यांची मुले नवीन काही शोध घ्यायला कचरतात. इतरांसारखेच करू पहातात.
आत्मविश्वास गमावतात. तर अनुभव घेताना चुका झाल्या तर ती शिकण्याची एक नवी संधी
मावी म्हणून त्या कडे बघायला पाहीजे. सध्या जैवतंत्रज्ञान या विषयात प्रगतीच्या
खूप संधी आहेत. जैवतंत्रज्ञानाबद्दल असे म्हणतात की – या क्षेत्रात वैज्ञानिक
व्हायचे असेल तर आपला प्रयोग फसल्याबद्दल
आनंदीत होता आले पाहीजे, म्हणजे त्याला एका चुकीच्या मार्गावर फुली मारून
नवा मार्ग शोधण्यासाठी नवे बळ मिळायला लागणार.
आता तिसरी गोष्ट.
आपल्या मुलामुलीच्या डोक्यात झालेल्या ज्ञानाच्या जोडण्या पुढे सरकत राहायला
हव्यात. मला झालेले ज्ञान हेच सर्व श्रेष्ठ आणि अंतीम आहे असा गर्व आपल्या
मुलामुलीला येता कामा नये. आपली स्पर्धा स्वत:शी आहे असे मानले पाहिजे. मी
कालच्यापेक्षा आज चांगले करीन आणि आजच्यापेक्षा उद्या चांगले करीन असा विश्वास
आपल्या पाल्यात निर्माण व्हायला हवा. त्यासाठी चांगले म्हणजे नेमके काय हेही समजले
पाहीजे. त्यासाठी एकमेकांशी सहज संवाद होईल असे वातावरण घरात राखायची गरज आहे. आई
आणि लेकीत असे संबंध असतात तसे ते बापलेकात, बापलेकीत, आईलेकात असण्यासाठी आपण
आपल्या घरात प्रयत्नपूर्वक प्रोत्साहीत करणारे वातावरण राखले पाहीजे. आपली मुले
नव्या जगात वावरतात त्यामुळे त्यांना आपल्याला न मिळालेले, न मिळू शकणारे अनुभव मिळालेले
असू शकतात त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडूनही घेण्यासारखे काही असू शकते अशी भावना
पालकांमध्ये असली की त्याचा एक सकारात्मक परिणाम संपूर्ण घरावर होतो आणि त्या
घरातील वातावरण मोकळे आणि पुढे प्रगती व्हायला पोषक होते.
अशा प्रकारे प्रयोग
करणे, अनुभव घेणे, त्यातल्या निरीक्षणांमधून काही निष्कर्ष काढणे आणि आपले
निष्कर्ष आपल्यापुरते न ठेवता इतरांच्या परिक्षणालाही उतरणे हे सगळे टप्पे वैज्ञानिकतेकडे
घेऊन जाणारे आहेत. याची आपल्याला कायमची गरज आहे. जेव्हा लोक झुंडीच्या विचाराला
बळी पडतात अशा समाजात तर वैज्ञानिक विचारसरणीची खूपच गरज आहे.
विनय र. र.
Nice article
ReplyDeleteInspiring for young parents
Thank you for your comments
Deleteलेख छान आहे.
ReplyDelete