विनोबा भावे
यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने – एक चिंतन
-
- नीला आपटे
विनोबांची
प्रयोगशील जीवनयात्रा
विनोबा भावे. एक दूरदर्शी तत्त्ववेत्ता, शिक्षण तज्ञ, क्रांतिकारक संत, वैश्विक मूल्ये स्वतःच्या जीवनात
उतरविण्यासाठी निरंतर झटणारा अध्यात्मिक आणि तितकाच विज्ञाननिष्ठ संशोधक, अत्यंत विरक्त जीवन जगणारा, पण ज्यांच्या
विचारांच्या किंवा साहित्याच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपलंसं
करून सोडणारा, आजन्म ब्रह्मचारी, अनेकांना पितृतुल्य असल्याने 'बाबा' या नावाने
संबोधिला जाणारा, महात्मा गांधीजींनी ज्यांचा 'अध्यात्मिक वारसदार' म्हणून उल्लेख केला असा एक ऋषितुल्य माणूस.
काही जण त्यांचा
उल्लेख आधुनिक संत म्हणून करतात, त्यांची
अध्यात्मिक बाजू किती महत्त्वाची आहे ते मांडतात. काहीजण त्यांना सामाजिक
क्रांतीकारक म्हणतात, त्यांच्या भूदान आंदोलनाने केवढी मोठी
क्रांती केली हे आवर्जून सांगतात. काहीजण विनोबांनी आणीबाणीच्या काळात न घेतलेल्या
भूमिकेमुळे त्यांच्यावर टीकास्त्र सोडतात, तर काहीजण त्यांनी मांडलेला लोकनीतीचा विचार किती दूरदर्शी
व शाश्वत राजकारणाचा विचार आहे हे सांगतात. या सगळ्या विचारातून आपल्याला जाणवते
ते विनोबांचे बहुआयामी जीवन आणि विचार. त्यांच्या जीवन आणि विचारात जेवढे खोल
डोकवावे, तेवढे वेगवेगळे पैलू आपल्याला दिसायला
लागतात आणि जाणवतं की आपल्याला विनोबा अजून बरेच कळायचे बाकी आहेत. त्यांच्याविषयी
आपलं कुतूहलही अधिकाधिक वाढत जातं आणि त्यांच्या जीवनाचे एक एक पदर आपण उलगडत
राहतो.
या 'आपण' मध्ये मी खऱ्या अर्थाने सहभागी झाले ती १२
- १५ वर्षांपूर्वी. त्यापूर्वी विनोबांचे नाव माहीत होते, त्यांच्या भूदान यात्रेविषयी थोडं वाचलं
ऐकलं होतं. सर्वोदय विचार, पवनार आश्रम, गागोदे या त्यांच्या जन्मगावी असलेला विनोबा
आश्रम, यांचा थोडाफार परिचय होता. त्यांचे मधुकर, गीता प्रवचने, विचार पोथी वगैरे साहित्य वाचनात आले
होते. पण खऱ्या अर्थाने विनोबा माझ्या मनात घर करून राहिले ते त्यांचे शिक्षण
विचार हे पुस्तक वाचले तेव्हा.
त्यांचे शिक्षण
विषयक विचार वाचले आणि माझ्या डोक्यात लख्ख उजाडल्यासारखे वाटले. शिक्षण क्षेत्रात
काम करत असताना जे काही अनुभव येत होते, ज्या समस्या जाणवत होत्या, ज्या कल्पना मनात येत होत्या, त्या सर्वांविषयी विनोबांनी पूर्वीच लिहिलेले आहे याची
प्रचिती आली. शिक्षणाला एक वेगळी दिशा देण्याची ताकद विनोबांच्या विचारात आहे असे
जाणवले आणि त्यांचा विचार व्यवहारात कसा उतरवता येईल, आताच्या काळाला सुसंगत अशी त्याची मांडणी
कशी करता येईल याचा विचार मी करू लागले.
विनोबांचा शिक्षण
विचार हे केवळ तत्वज्ञान नाही तर त्यांनी स्वस्त: अनुभवलेले, सिद्ध केलेले एक
शास्त्र आहे. जो जो विचार त्यांच्या मनात आला तो तो विचार आचरणात आणण्याचा त्यांचा
निग्रह असे. त्यामुळेच त्यांचे विचार हे त्यांच्या जगण्यातून तावून सुलाखून निघालेली
'सत्ये' आहेत; शाश्वत, सार्वत्रिक आणि सर्वसमावेशक. विनोबांचे जीवन हीच एक प्रयोगशाळा होती
जणू.
अगदी
लहानपणापासूनच प्रत्यक्ष प्रयोग करून अनुभव घेण्याचा व कृतीतून शिकण्याचा त्यांचा
स्वभाव होता.
आठ वर्षांचे
असताना ते बडोद्यात शिकण्यास गेले. लहानपणापासूनच स्वदेशीचा विचार व
देशप्रेम त्यांच्या मनात रुजत होते. आपल्या जीवनात स्वदेशीचे मूल्य जपण्याचा
त्यांचा कसोशीने प्रयत्न चालला होता. एकदा घरातील कंदिलाची काच परदेशी आहे असे
लक्षात आल्यावर त्यांनी ती फोडून टाकली होती आणि त्यासाठी वडिलांचा मारही खाल्ला
होता. आपल्या देशात, उन्हाळी प्रदेशात, विशेषतः कोकणात, कमीत कमी कपडे वापरण्याची पद्धत आहे. ब्रिटिशांचा अंगभर पेहराव त्यांना अजिबात
रुचत नव्हता. त्यामुळे सर्व तथाकथित शिष्टाचाराला न जुमानता, ते महाविद्यालयाच्या वाचनालयातही उघडे
रहात असत. याविषयी ब्रिटिश ग्रंथपालाने त्यांना हटकले असता, स्वतः खुर्चीवर बसून व समोरच्या माणसाला
उभे ठेवून बोलणे हे भारतात सौजन्याचे मानले जात नाही, असे ठणकावून सांगत भारतीय शिष्टाचाराचा
धडाच सुनावला होता. मनाला पटेल ते आचरणात आणण्याचे धाडस त्यांच्यात होते, लोकलाजेस्तव किंवा
लोकाग्रहास्तव आपल्याला अनुचित वाटणारे किंवा न पटणारी गोष्ट त्यांनी कधीच केले
नाही. त्यांचा स्वभाव असा अंतर्बाह्य निर्भय होता. केलेला निश्चय निष्ठेने पाळणं
हा विनोबांचा जणू स्थायीभाव होता. वयाच्या चौथ्या वर्षी उपनयन संस्काराचा वेळेस
त्यांनी आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याचा निश्चय केला होता आणि तो त्यांनी खरोखरच आजन्म
निष्ठापूर्वक पाळला. वयाच्या सतराव्या वर्षी विनोबांनी गृहत्याग करण्याचा निश्चय
केला. लहानपणी केलेल्या ब्रह्मचर्याचा निश्चयाचे बळ ही सोबत होतेच. घराच्या
सुरक्षित भिंती ओलांडून बाहेर पडल्यावर प्रतिकूल परिस्थितीत निभाव लागावा यासाठीची
तयारी विनोबांनी आधीपासूनच सुरू केली होती. व्यायाम, गादीवर न झोपणे, चप्पल न घालणे, थंड पाण्याने अंघोळ अशा गोष्टींची सवय
त्यांनी आधीपासूनच स्वतःला लावून घेतली होती त्या आधारित जीवन जगण्याचा त्यांचा
प्रयोग असाच कष्टप्रद परंतु निष्ठाधिष्ठित होता.
वाई येथे जवळजवळ तेरा महिने ते वास्तव्यास होते. त्यावेळेस त्यांनी गीता, उपनिषद व इंग्रजी यांचे वर्ग चालविले. या वर्गातील विद्यार्थ्यांना घेऊन विद्यार्थी मंडळ सुरू केले. विद्यार्थी मंडळाचे वाचनालय स्थापन केले. त्याच्या खर्चासाठी ते लोकांची दळणे दळून देत असत. रोज सहा ते आठ शेर धान्य ते दळत असत. विनोबांनी स्वतःवर आहाराचेही अनेक प्रयोग केले. सहा महिने मीठ सोडले, काही दिवस दूध सोडले, एक महिना दूध, केळी व लिंबू एवढाच आहार घेतला, ११ पैशात आपला आहार बसविण्याच्या नादात केळी व लिंबू - चार पैसे, ज्वारी - दोन पैसे, दूध - पाच पैसे, असा मर्यादित आहार ते घेऊ लागले.
विनोबांनी अर्थशास्त्राचे अध्ययन सुरू केले तेव्हा, भारतातील लोकांचे कमीत कमी उत्पन्न दिवसाला दीड ते दोन आणे इतके होते. तेव्हा विनोबांनीही आपला रोजचा आहार दोन आण्यात भागविण्याचा निश्चय केला. इतक्या कमी रकमेत रोजच्या आहारात जोंधळ्याची भाकर, शेंगदाणे, गूळ, डाळ, मूठभर भाजी, थोडे मीठ व चिंच एवढेच ते खात असत. या दरम्यान ते दिल्लीला गेले होते तेव्हा तेथे महागाई असल्याने त्यांनी शेंगदाणे आपल्या आहारातून वगळले, परंतु दोन आण्यात जेवण भागविण्याचा आपला निश्चय कायम ठेवला.
विनोबांनी आरोग्य सुधारण्यासाठी स्वतःवर खूप प्रयोग केले. रोज दहा ते बारा मैल चालणे, तीनशे सूर्यनमस्कार घालणे, असा नित्यनियम केला. साबरमती आश्रमात वस्त्र निर्मितीचे काम सुरू झाले तेव्हा विनोबा प्रामुख्याने विणकाम करीत असत. एका दिवसात पंचवीस वार नवार विणून त्यावर निर्वाह होऊ शकेल का हे तपासून पाहण्यासाठी एकदा विनोबा सलग दहा तास नवार विणत बसले होते. दहा तासात त्यांनी पंचवीस वार नवार विणली. विनोबांनी कापूस पिंजणे, पेळू बनविणे, सूतकताई, विणकाम अशी सर्वच कामे तासनतास केली. गांधीजींचा रोज नेमाने सूतकताई करण्याचा आग्रह त्यांना तसा मान्य नव्हता. परंतु गांधीजींनी त्याविषयी नाराजी व्यक्त केली, तेव्हा त्यांनी गांधीजींना, बारा वर्षे सलगपणे रोज एक तास सूतकताई करण्याचा निश्चय कळवला आणि आजारपणातही या कामात खंड पडू न देता आपला निश्चय पूर्ण केला. आश्रमातील सर्व प्रकारची स्वावलंबनाची व कष्टाची कामे विनोबा निष्ठेने व जबाबदारीने पूर्ण करीत असत. एक दिवस अँड्र्यूज हे आश्रमात आलेले असताना, विनोबांची ओळख करून देताना गांधीजी म्हणाले होते, "हे म्हणजे संपूर्ण आश्रम आहेत."
मैलोनमैल पायी चालण्याचे विनोबांना काहीच विशेष वाटायचे नाही. रोजचे दहा-बारा मैल चालणे हे ठरलेलेच. शिवाय अनवाणी चालण्याचा त्यांचा निश्चय होता. जवळ जवळ संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी अनवाणी पायी प्रवास केला - ऊन, पाऊस, कशाचीही तमा न बाळगता! कडक उन्हात अनवाणी चालल्यामुळे त्यांची दृष्टीही कायमची अधू झाली होती. परंतु चष्माही न वापरण्याचा त्यांचा नियम होता. त्यांच्या अशा कष्टदायक नियमांविषयी गांधीजींना कळले, तेव्हा गांधीजींनी विनोबांना सरळ आदेश दिला. तेव्हापासून ते चप्पल व चष्मा वापरू लागले.
विनोबांच्या पुढाकारामुळे वर्ध्याचा आश्रम म्हणजे जणु कातण्या - विणण्याची प्रयोगशाळाच बनला होता. खादी वस्त्र निर्मितीच्या प्रक्रियेतील सर्वच कामांमध्ये विनोबांनी असंख्य प्रयोग केले. तेव्हा विनोबा सतत नऊ दहा तास सूतकताई करीत. तकली वर सूत काढण्यात ते अत्यंत तरबेज होते. तकलीचा शोध त्यांनी लावला असे म्हणणेही वावगे ठरणार नाही. कताईची मजूरी निश्चित करण्याचे ठरले, तेव्हा त्यांनी सूतकताईने जीवननिर्वाह करण्याचा निश्चय करून प्रयोग सुरू केला. गांधीजींनी त्यांना विचारलं की त्यांची रोजची मजुरी किती पैसे भरते, तेव्हा विनोबांनी त्यांना सांगितलं की, रोजची मजुरी दोन आणे व रोजचा खर्च आठ आणे आहे. हे ऐकून गांधीजींनी त्वरित
निर्णय घेतला आणि गांधीजींच्या सूचनेनुसार चरखा संघाने मजुरी वाढवून दिली. विनोबांच्या
प्रयोगशीलतेमध्ये इतकी नैतिक आणि निर्णायक ताकद होती.
नालवाडी वर्धा येथील दलित वस्तीत विनोबा राहायला गेले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम भंगीकाम सुरू केले. त्याकाळी दलित भंगीकामाला कमी लेखत असत. त्यामुळे दलित वस्तीत राहिल्यामुळे सवर्णांनी आणि भंगी काम करतात म्हणून दलितांनी, विनोबा व त्यांच्या सहकाऱ्यांना वाळीत टाकले होते. परंतु सर्वांचा रोष पत्करूनही त्यांनी आपले श्रमप्रतिष्ठा व अस्पृश्यता निवारणाचे मूल्य निष्ठेने जपले. खरं तर गांधीजी व त्यांच्या अनुयायांनी अस्पृश्यता निवारणासाठी निवडलेला हा एक मार्ग होता. जी कामे समाजोपयोगी व अनिवार्य आहेत, परंतु समाजात त्यांना प्रतिष्ठा नाही, ती कामे उच्चभ्रू समाजातील लोकांनी करावीत. प्रतिष्ठित समाजातील लोकांनी ही कामे केली तर आपोआपच या कामांना सामाजिक प्रतिष्ठा मिळेल व अस्पृश्यता नष्ट होईल असा यामागचा विचार होता.
गांधीजींनी व्यक्तिगत सत्याग्रहातील पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली होती. त्या सत्याग्रहात विनोबांनी एकूण नऊ महिने तुरुंगवास भोगला. तुरुंगात असतानाही त्यांची दिनचर्या आश्रमातल्या सारखीच असायची. पहाटे उठणे, सकाळी-संध्याकाळी प्रार्थना, गीता - संस्कृत शिकवणे, सूतकताई, असे सर्व कार्यक्रम तुरुंगातही अव्याहतपणे सुरू असत, कारण त्यांचा तसा निर्धारच होता.
विनोबांचा अत्यंत
महत्त्वाचा प्रयोग होता तो भूदान यज्ञाचा. समाजात क्रांती घडवून आणणारा तो प्रयोग होता. जो जो शेतीत कष्ट करतो, राबतो, त्याला हक्काची जमीन देण्याचा तो प्रयोग होता. विनोबा म्हणायचे, "हे केवळ दान नाही, तर यज्ञ आहे. दान हे फक्त श्रीमंत माणूस करतो, पण यज्ञात लहान-थोर कोणीही सहभागी होऊ शकतो.” विनोबा लोकांना नम्रपणे आवाहन करीत. "उत्पन्नाचा सहावा भाग राजाला दिला जातो. तुम्ही तुमच्या जमिनीचा सहावा भाग दरिद्रनारायणास द्या." कधी म्हणत, "कर्ण हा सहावा पांडव होता. त्याचा राज्यसत्तेतील हिस्सा नाकारला गेला आणि महाभारत घडले. आजचा भूमिहीन हा सहावा पांडव आहे. त्याला न्याय द्या. जमिनीचा त्याचा हिस्सा त्याला द्या. नाहीतर रक्ताचे पाट वाहतील. विनोबांच्या शब्दात, वाणीत मोठीच ताकद होती. केवळ शब्दांच्या माध्यमातून विनोबांनी जनतेला जमीन देण्याची हाक दिली आणि त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत लोकांनी ४७ लाख एकरापेक्षा जास्त जमीन दान दिली. विनोबा तेरा वर्षे सातत्याने लोकांना भूदान
यज्ञामध्येजमिनीची आहुती देण्याचे आवाहन करत भारतभर पायी हिंडले, पदयात्रा केली. भूदान यात्रेत विनोबा इतके चालले, की त्यांनी तेवढे चालून अखंड पृथ्वीला तीन वेळा प्रदक्षिणा घातली असती.
भूदानाच्या पुढे जाऊन विनोबांनी ग्रामदानाचा विचार मांडला. 'सब भूमी गोपाल की' या न्यायाने जमिनीवरच्या हक्काचे विसर्जन करावे व संपूर्ण जमिनीवर गावाचा सामूहिक मालकी हक्क राहावा असा तो विचार होता. विनोबांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत, एकट्या महाराष्ट्रात वीस गावे ग्रामदानी झाली. भूदान - ग्रामदान यज्ञ हा विनोबांच्या जीवनातील सर्वात मोठा अहिंसक सामाजिक क्रांतीचा प्रयोग होता.
चंबळ खोऱ्यातील डाकूंचे मनपरिवर्तन करून त्यांना शरण यायला भाग पाडणे, ही विनोबांच्या आत्मिक व अध्यात्मिक बलाची कसोटीच होती. चंबळ सारख्या धोकादायक प्रदेशात निर्भयपणे जाणे व तेथील डाकूंच्या सत्शील - सज्जन वृत्तीला साद घालणे हा विनोबांच्या जीवनातील महत्त्वाचा प्रयोगच म्हणावा लागेल.
विनोबांनी जीवनाच्या अखेरीसही प्रयोगशीलतेचा ध्यास सोडला नव्हता. अध्यात्मिक अंगाने त्यांना उच्चतम पातळीवर घेऊन जाणारा हा अखेरचा प्रयोग होता, प्रायोपवेशनाचा! जीवनाविषयी पूर्णपणे समाधानी मनाने, ऐहिक जीवनातील सर्व मोहपाशांतून मुक्त होऊन स्वेच्छेने मृत्यूला जवळ करण्याचा, सूक्ष्मपणे या पृथ्वीतलाचा निरोप घेण्याचा हा प्रयोग होता.
असे होते आचार्य विनोबा भावे, विज्ञान आणि आत्मज्ञान दोन्हींशी अतूट नाते जोपासणारे, वैज्ञानिक व अध्यात्मिक सिद्धांत प्रत्यक्ष आचरणातून सिद्ध करून दाखविणारे, महान कर्मयोगी, कर्मनिष्ठ जीवन यात्री!
त्यांच्या १२५ व्या
जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
पुढील लिंकवर क्लिक करून अधिक माहिती मिळवा -
https://vinoba125.blogspot.com/2019/11/vinoba-bhave-by-neela-apte-part-2.html
https://vinoba125.blogspot.com/2019/11/vinoba-bhave-by-neela-apte-part-3.html
https://vinoba125.blogspot.com/2019/11/vinoba-bhave-by-neela-apte-part-4.html
https://vinoba125.blogspot.com/2019/11/vinoba-bhave-by-neela-apte-part-5.html
https://vinoba125.blogspot.com/2019/11/vinoba-bhave-by-neela-apte-part-6.html
https://vinoba125.blogspot.com/2019/11/vinoba-bhave-by-neela-apte-part-7.html
https://vinoba125.blogspot.com/2019/11/vinoba-bhave-by-neela-apte-part-8.html
पुढील लिंकवर क्लिक करून अधिक माहिती मिळवा -
https://vinoba125.blogspot.com/2019/11/vinoba-bhave-by-neela-apte-part-2.html
https://vinoba125.blogspot.com/2019/11/vinoba-bhave-by-neela-apte-part-3.html
https://vinoba125.blogspot.com/2019/11/vinoba-bhave-by-neela-apte-part-4.html
https://vinoba125.blogspot.com/2019/11/vinoba-bhave-by-neela-apte-part-5.html
https://vinoba125.blogspot.com/2019/11/vinoba-bhave-by-neela-apte-part-6.html
https://vinoba125.blogspot.com/2019/11/vinoba-bhave-by-neela-apte-part-7.html
https://vinoba125.blogspot.com/2019/11/vinoba-bhave-by-neela-apte-part-8.html
No comments:
Post a Comment